ती प्रथा निराळी!

प्रा. बी. आर. कुलकर्णी
Friday, 10 January 2020

देवीच्या विहिरीत बाळाचा पाळणा फिरवायचा आणि त्याला देवीचा आशीर्वाद मागायचा, ही प्रथा पहिल्यांदाच पाहत होतो.

देवीच्या विहिरीत बाळाचा पाळणा फिरवायचा आणि त्याला देवीचा आशीर्वाद मागायचा, ही प्रथा पहिल्यांदाच पाहत होतो.

कऱ्हाडपासून दहा किलोमीटर अंतरावरच्या कालवडे गावी धार्मिक कार्यक्रमासाठी जाण्याचा योग आला. या गावात चिलाईदेवीचे तीनशे वर्षांपूर्वीचे जुने देऊळ आहे. देवीसमोरच चौकोनी आकाराची दगडी बांधकाम केलेली विहीर असून, उतरण्यासाठी शेवटपर्यंत पायऱ्या आहेत. विहिरीत वर्षभर भरपूर पाणी असते. या गावची एक आगळी-वेगळी धार्मिक, कौटुंबिक प्रथा आहे. या गावातील प्रत्येकाच्या (मुलांच्या, तसेच लग्न होऊन परगावी गेलेल्या मुलीच्याही) पहिल्या अपत्यास आठ ते दहा वर्षांचे असताना देवीच्या समोरील विहिरीत, फुलांनी सजविलेल्या लाकडी पाळण्यात बसवून सात फेरे मारले जातात. प्रथम मुलास किंवा मुलीस स्नान घालून, नवे कपडे, तसेच फेटा बांधून वाजत-गाजत देवीच्या मंदिरापर्यंत आणतात. अपत्यासह त्याचे आई-वडील देवीची मनोभावे पूजा-अर्चना करतात. देवीचा गुरव देवीस आणलेला पुरण-पोळीचा नैवेद्य दाखवतो. त्यानंतर त्या अपत्यास पाळण्यात बसविले जाते. त्याच्या हातात श्रीफळ-फुले दिली जातात. पाळणा पाण्यात तरंगण्यासाठी, पाळण्याच्या चारही बाजूस पत्र्याच्या घागरी बांधल्या जातात. विहिरीच्या चारही बाजूस उंच काठी घेऊन चार व्यक्ती उभ्या राहतात. नंतर पाळणा काठीने या चार व्यक्ती विहिरीभोवती गोलाकार फिरवतात. पाळण्यापुढे तरंगत्या पाटावर पुरणपोळीचा नैवेद्य आणि पणतीचा दिवा ठेवलेला असतो. एकूण सात फेरे झाल्यानंतर, त्या अपत्याचे औक्षण करून त्याला पाळण्यातून बाहेर आणले जाते. मग त्या अपत्यास मामा खांद्यावर घेऊन देवीच्या दर्शनास आणतात. यानंतर समोरच असलेल्या सभागृहात आलेल्या सर्व सुहासिनींची खणा-नारळाने ओटी भरली जाते. मग वाजत-गाजत सर्वजण घरी येतात. प्रथेप्रमाणे आलेले सर्व पाहुण्यांना आणि गावकऱ्यांना पुरण-पोळीचे जेवण देऊन कार्यक्रमाची सांगता होते. या कार्यक्रमामुळे मुला-बाळाला दीर्घायुष्य मिळते आणि कुटुंबाची भरभराट होते, असा गावकऱ्यांचा दृढ विश्‍वास आहे. माझे मित्र डॉ. दिनकर थोरात यांचे नातू राजवीर व साई आणि नाती गार्गी व सान्वी अशा चार जणांचा सोहळा आम्ही पाहिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by prof b r kulkarni