‘लाइक’च्या जमान्यात..

कीर्ती जाधव
Tuesday, 21 January 2020

कोणी कौतुक केले तर हुरळून जायला होते. पण, आपल्या एखाद्या ‘पोस्ट’ला मिळणाऱ्या ‘लाइक्स’वरून स्वतःला आजमावणे कितपत योग्य आहे?

‘लाइक करणे’ हा आजच्या ‘ऑनलाइन’च्या जगतात परवलीचा शब्द झाला आहे. स्तुती कुणाला आवडत नाही. सगळ्यांनाच आवडते. कुणी कौतुकाचे चार शब्द व्यक्त केले, तर निश्चितच क्षणभर सुखावह वाटते. पण, या मानवी भावनेलाही बरेच कंगोरे आहेत. आपण एखादी आनंदाची गोष्ट समाजमाध्यमावर टाकली की शुभेच्छांचा, कौतुकाचा वर्षाव सुरू होतो. खरे तर यातील थोडे फार लाइकच मनापासून ती गोष्ट आवडल्याने असतात. काही जणांचा केवळ हितसंबंध जपण्यासाठी स्तुती करण्याचा उद्देश असतो.

पूर्वी नवऱ्याला जेवायला पानात वाढल्यावर त्याने तो परत मागितला की तो पदार्थ त्याला आवडला आहे, असे बायका समजत असत. आता मात्र लगेच आपल्या पदार्थाचे कौतुक व्हावे, अशी बायकांची अपेक्षा असते. पूर्वी तोंडावर प्रत्यक्ष स्तुती करण्याने ती व्यक्ती हुरळून तर जाणार नाही ना, असे वाटल्याने पाठीमागे कौतुक करण्याला जास्त प्राधान्य असायचे. खरे तर कौतुकाने माणसाचा उत्साह अधिकच दुणावतो. आपल्या कामाची कोणीतरी दखल घेत आहे, ही भावना सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. शाबासकीची थाप पाठीवर पडल्याने जीवनात कितीतरी व्यक्ती यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र कधीकधी अतिस्तुतीने माणसाचे कार्यक्षेत्र संकुचित राहण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच खोटी स्तुती यशाला मारक होऊ शकते म्हणून स्तुतीलाही मर्यादा असाव्यात. सध्या तर लाइकचा जमाना आहे. आपल्या जीवनातला कोणताही आनंदाचा क्षण किंवा एखादी पोस्ट समाजमाध्यमावर ‘अपलोड’ करणे आणि दिवसभरात आपल्याला किती लाइक मिळाले यावरून स्वतःबद्दल इतरांबद्दल तर्कवितर्क करत राहणे, हाच नेटकऱ्यांचा छंद झाला आहे. कुणीच लाइक किंवा कमेंट करत नाही, या बाबीला अवास्तव महत्त्व दिल्याने तरुण पिढीमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागत आहे. चांगले काम करणे आणि समाजाकडून त्याची पोचपावती मिळणे, हे जरी अनुस्यूत असले तरी लाइकच्या आहारी आपण किती जायचे आणि आपला मौल्यवान वेळ त्यासाठी किती खर्च करायचा, हे शेवटी ज्याचे त्यानेच ठरवले पाहिजे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by prof kirti jadhav