जीवघेणी परीक्षा

muktapeeth
muktapeeth

बुद्धिमत्तेला खतपाणी घातले पाहिजे. लक्ष्य ठरवून अभ्यास करण्याची सवय लावली पाहिजे. त्याचबरोबर अपयश सहन करण्यासाठी मन खंबीर केले पाहिजे.

त्या काळरात्री एक आर्त किंकाळी ऐकू आली. भिरभिरत दगड कोसळावा तसा वेगाने सातव्या मजल्यावरून कोसळणारा एक कुमारवयीन देह दिसला. बुद्धिमान मेंदू नारळाची छकले छकले व्हावीत तसा छिन्नविछिन्न. शब्दांना बधिर करणारा, भावना गोठविणारा प्रसंग. सतरा-अठरा वर्षांचा सुकुमार देह असा हकनाक बळी पडतो, हा दोष कुणाचा? बदलत्या समाजरचनेचा? सदोष परीक्षा पद्धतीचा? जीवघेण्या स्पर्धेचा? तो आईवडिलांसाठी एकुलता होता. शाळेसाठी उत्तमातला एक आदर्श. मित्रपरिवारासाठी स्कॉलर. दहावीतील नेत्रदीपक यशानंतर आत्मविश्‍वासाने पुढचे पाऊल टाकले होते. एकच लक्ष्य! जीव ओतून केलेला अभ्यास. एका प्रवेश परीक्षेला तो सामोरा गेला. काय घडले न कळे, पण एका क्षणी स्पर्धेच्या, परीक्षेच्या गतिमान चक्रातून तो बाजूला भिरकावला गेला. त्याची संधी हुकली. ‘‘मला सारे काही येत असूनही मी काहीच करू शकत नाही,’’ या नैराश्‍याचा विळखा बसला. जिवाचे रान करून केलेला अभ्यास निरर्थक ठरला. म्हटले जाते, मुलांना अपयश सोसता आले पाहिजे. अडथळ्यावर मात करता आली पाहिजे. नकार पचविता आला पाहिजे. येणारा धक्का सोसून उभारी धरता आली पाहिजे. असे केले पाहिजे, तसे केले पाहिजे असे सगळेच जण म्हणतात. पण लहानपणापासून उमलत्या, फुलत्या जिवाला आपणच यशाची चटक लावतो ना!

कधीतरी पहिल्यांदा शाळेत मिळालेला पहिला क्रमांक. हा क्रमांक तू टिकवून ठेवायचा, हे त्याच्या मनावर बिंबवणारे असतात ते शिक्षक, पालक, नातेवाईक अन्‌ शेजारीपाजारी. मग चार-दोन गुण कमी मिळाले तरी त्याच्यापेक्षा इतरांच्याच अंगाची लाही होते. निसर्गाकडे पाहा ना! पाण्याच्या प्रवाहात अडथळा आला तर त्याला वळसा घालून पाणी पुढे जाते. मुंग्यांची रांग कशामुळेही विस्कटली तरी त्या पुन्हा एकत्र येऊन रांगेत चालू लागतात. अडथळ्यांवर मात कशी करावी, हे शिकण्यासाठी निसर्गात अनेक उदाहरणे सापडतील. पण आपण जीवनातल्या एखाद्या अडथळ्याने इतके हतबल होतो? समाजाने, पालकांनी, परीक्षा यंत्रणेने अशा घटनांवर चिंतन करून निश्‍चितपणे मार्ग काढायला हवा. आपणही बुद्धीला खतपाणी घालताना बळकट, खंबीर मने घडवायला हवीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com