अंगात आलंया...

राहुल भालेराव
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

गणपती मंडळाने कालीमातेचा देखावा केला होता. त्या देखाव्याचे दर्शन होताच काही बायकांच्या अंगात देवी यायला लागली होती.

गणपती मंडळाने कालीमातेचा देखावा केला होता. त्या देखाव्याचे दर्शन होताच काही बायकांच्या अंगात देवी यायला लागली होती.

एका गणपती मंडळात भव्य असा कालीमातेचा देखावा केला होता. यांत्रिक हालचालीत देवीची जीभ बाहेर यायची. महिलावर्गात देखावा लोकप्रिय झाला. लोकांची गर्दी होऊ लागली. असेच एक आवर्तन सुरू असताना देवीची बाहेर आलेली जीभ पाहून एका बाईनेही जीभ बाहेर काढली आणि तत्क्षणी घुमायला लागली. आमचा देखावा पाहायला आलेले लोक ‘देवी’भोवती जमा झाले. आता त्या बाईने रीतसर बैठक मारली. केस मोकळे सोडले. हातांची बोटे एकमेकात अडकवून हुंकार देऊन घुमायला लागली. लोक तिला घरगुती अडचणी आणि प्रश्न विचारू लागले. आता हे सर्व सुरू असताना आमचा देखावा कोण पाहणार? देवीसमोर लोकांचे प्रश्न सुटत असताना आमच्या समोर.. देखाव्याचे करायचे काय, हा प्रश्न निर्माण झाला. एका कार्यकर्त्याने हा प्रश्न त्या बाईलाच विचारला. ‘देखावा सुरळीत कसा होईल?’ ती म्हणाली, ‘मानपान करा!’ एका जाणकार म्हातारीने सांगितले, ‘देवीची ओटी भरा.. ’ कुणीतरी हळद, कुंकू, खोबरे, ब्लाऊजपीस असे साहित्य आणले. एका बाईने ओटी भरली. देवी प्रसन्न झाली आणि आशीर्वाद देऊन निघून गेली.

पण.. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाईच्या अंगात आले. ‘देवीला साडी-चोळी करा,’ असे देवीनेच फर्मान सोडले. बिचारे कार्यकर्ते कुठल्याशा साडीच्या दुकानातून साडी घेऊन आले. साडी पाहून त्या बाईच्या अंगातील देवी गायब झाली आणि मंडळ ख्यातनाम झाले. अंगात आल्यावर साडी मिळते ही बातमी पंचक्रोशीत पसरली आणि काय सांगू महाराज, त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून एका वेळी पाच-सहा महिलांच्या अंगात देवी येऊ लागली. मंडळाला साड्यांचा गठ्ठाच आणावा लागला. सातव्या दिवसापर्यंत घुमणाऱ्या बायकांची संख्या पन्नासपर्यंत पोचली. घुमता घुमता साड्यांच्या रंगांवरून भांडू लागल्या. मंडळाचा अर्थसंकल्प तोट्याचे आकडे दाखवू लागल्यावर एके दिवशी गंमत पाहत राहिलो. मनात म्हटले, ‘बघू किती वेळ घुमतायत!’ दीड-दोन तास घुमून कंबर दुखल्यावर बायका साडीचा कानोसा घेत हळूहळू निघून जाऊ लागल्या. एकूणच देवीचे मानपान महागात पडले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by rahul bhalerao