सौरपूजा

सां. रा. वाठारकर
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

अनेक लोकसमूह सूर्यदेवाची उपासना करतात. पूर्वी सौरऊर्जेचा उपयोग करून घेण्यासाठी त्याचा संबंध धार्मिकतेशी जोडला होता. आताच्या काळात उपकरणांद्वारा सौरऊर्जा मिळवली जाते.

अनेक लोकसमूह सूर्यदेवाची उपासना करतात. पूर्वी सौरऊर्जेचा उपयोग करून घेण्यासाठी त्याचा संबंध धार्मिकतेशी जोडला होता. आताच्या काळात उपकरणांद्वारा सौरऊर्जा मिळवली जाते.

जगात अनेक लोकसमूह सूर्याला देव मानतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सूर्योपासना कित्येक पिढ्यांपासून सुरू आहे. आपल्या सणांशीही सूर्याचा संबंध आहे. मी कळत्या वयाचा असताना ज्या गल्लीत राहत होतो तिथे पलीकडे एका चुलीवर भाकरी भाजून घरच्या छतावर पत्र्यावर वाळत टाकलेले पाहिले. कुतूहलाने त्या घरातील लोकांना याबाबत विचारले, तर ते म्हणाले, ‘‘आम्ही तीर्थक्षेत्राला जाणार आहोत. दहा-बारा दिवस तरी लागतात. या तीर्थक्षेत्रात जाताना सूर्याला दाखवलेली भाकर नेण्याची धार्मिक पद्धत आहे.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘ही आमची शिदोरी आहे. या प्रवासात ही अशी सूर्याला दाखवलेली भाकरी खायची असते.’’ विचार केल्यानंतर, विज्ञान कसे धार्मिकतेशी जोडलेले आहे हे लक्षात आले. सूर्याच्या उन्हात वाळवलेली भाकरी खूप दिवस टिकते. तिला बुरशी लागत नाही.

जी गोष्ट ऊर्जा देते त्याची पूजा करणे हे आपल्या संस्कृतीचे एक वैशिष्ट्य आहे. म्हणून आपल्याकडे सूर्यमंदिरे आहेत. सूर्योपासना करताना आपण तोंड पूर्वेला करतो. सकाळी नदीत स्नान केल्यानंतर अर्ध्य द्यायची पद्धत आहे. तेथेही विज्ञानच आहे. अर्ध्य म्हणजे हातात पाणी घेऊन ते ओंजळीतून पुन्हा नदीत सोडायचे असते. तेही कसे तर, त्या धारेच्या माध्यमातून सूर्यबिंब पाहायचे असते. अशा वेळी प्रकाशकिरण पृथक्करण होऊन सात रंग क्षणभरच शरीरावर पडून लोप पावतात. ते आरोग्यदायी असतात. आपण आकाशात दिसणारे आल्हाददायक इंद्रधनुष्य पाहिले आहेच. आज या विज्ञान युगात सूर्याच्या किरणाद्वारे ऊर्जानिर्मिती, मग ती विजेच्या स्वरूपात असो किंवा अन्य, सहज साध्य झाली आहे. या शोधाचा साऱ्या मानवजातीला फायदा झालेला आहे. कैक लोक आपल्या घराच्या छतावर सौरऊर्जेचे उपकरण बसवून आपली विजेची थोडी फार गरज भागवत आहेत. ही या युगातील सौरपूजाच आहे. सूर्यापासून उर्जा मिळवणे हे महत्त्वाचे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by s r watharkar