मनाचा थांगदोरा

सां. रा. वाठारकर
Friday, 24 January 2020

राग आला की आपण काय करतो आहोत याचेही भान उरत नाही. राग ओसरला की पश्चाताप होतो.

राग आला की आपण काय करतो आहोत याचेही भान उरत नाही. राग ओसरला की पश्चाताप होतो.

लोक रस्त्यावर पडलेले एखादे दुसरे फूल झटकून घेत आणि आपल्या पिशवीत टाकत व झाडाखाली बसलेल्या त्या मुलाकडे ते नेमके पैसे नेऊन द्यायचे. मुलगा रडवेला चेहरा करून बसला होता. ज्या रस्त्यावर फुले पडली होती तो जरा कमी वाहतुकीचा होता. येणारे लोक नेहमीचेच त्याचे गिऱ्हाईक होते. ती फुले रस्त्यावर का पडली? मुलाची गाडी तिथे उलट्या अवस्थेत का होती? काय घडले होते? वाहतूक पोलिस सकाळी सकाळी हा मुलगा गाडी लावत असताना आला आणि नेहमीप्रमाणे विचारले, ‘‘माझी भाजी आणलीस का?’’ मुलगा ‘नाही’ असे मानेनेच उत्तरला. ‘‘उद्यापासून नियमितपणे आणतो. आज जमले नाही,’’ इति मुलगा. हवालदाराला काय वाटले, कोण जाणे. त्याने फुले भरलेली हातगाडी रस्त्यावर उलटी केली. फुले पडली धुळीत. रागाचा पारा काय असतो हे सर्वांनी पाहिले. आश्‍चर्य हे की, हा हा म्हणता सारी विखरून पडलेली फुले विकली गेली. सर्व पैसे त्या मुलाकडे जमा झाले. तो थोडा आनंदला.

मोकळी हातगाडी उभी करून तो चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेला. बाहेर येऊन पाहतो, तर तो नेहमीचा पोलिस त्याच्या गाडीपाशी थांबला होता. आणि म्हणाला, ‘‘बेटा माफ कर. माझ्या हातून कशी काय चूक झाली नी तुझी गाडी मी उलटी केली. इथून गेल्यावर आपण जे केले ते चुकीचे केले हे माझ्या लक्षात आले. अरे, तू गावाकडचा शेतकऱ्याचा मुलगा. तू नेहमी फुले आणून विकतोस. अरे! तुझी भाकरी मी काढून घ्यायचा प्रयत्न केला.’’ मुलगा म्हणाला, ‘‘जाऊ द्या साहेब! जे झाले ते झाले. चला, मी तुम्हाला मिसळपाव देतो.’’ दोघे हॉटेलमध्ये गेले आणि पोलिस पैसे देऊ लागला. मुलगा म्हणाला, ‘‘हे काय करताय!’’ त्यावर पोलिस म्हणाला, ‘‘अरे मी आधीची चूक दुरुस्त करतोय.’’ मुलगा काही बोलला नाही. मुलाने आपली हातगाडी घेऊन गावचा रस्ता पकडला. पोलिसाने आपली गाडी दुसऱ्या दिशेने काढली. थोडे दूर गेल्यावर दोघांनीही पाठमोरे होऊन एकमेकांकडे पाहिले आणि हात उंचावले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by s r watharkar