सावरली अन् सुखी झाली

संगीता बोरगे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

नवऱ्याचा जाच असह्य झाल्यावर तिने घर सोडले. समजावल्यावर ती पुन्हा घरी गेली. संसारात सुखी झाली.

नवऱ्याचा जाच असह्य झाल्यावर तिने घर सोडले. समजावल्यावर ती पुन्हा घरी गेली. संसारात सुखी झाली.

शाळा सुटली आणि एका सहा सिटरमधून निघाले. वाटेत एक विवाहिता दोन-तीन वर्षांच्या मुलासह बसली. ती त्या मुलाला कवटाळून रडत होती. रडून शांत झाल्यावर तिला विचारले, ‘‘कोठे जायचेय?’’ ‘‘माहीत नाही.’’ मला शंका आली, तरीही मी गप्प बसले. माझ्या स्टॉपवर विचारले, ‘‘पैसे आहेत का? कोठे उतरणार आहेस?’’ ‘‘पैसे नाहीत, गाडी शेवटी जिथे थांबेल तिथे उतरेन.’’ हिला अनोळखी लोकांसोबत जाऊ देणे योग्य नव्हते. मी तिला ‘इथेच उतर’ असे दरडावून सांगितले. तिनेही ते ऐकले. आम्ही घरी आलो. मी वरण-भाताचा कुकर लावला. तिला, तिच्या मुलाला जेऊ घातले. जेवल्यानंतर ती माझ्या हातातील सर्व कामे घेऊन करू लागली. तिला मी मुलाला झोपवायला सांगितले. मुलाला झोपवताना तीही शांत झोपली. एक-दीड तासाने तिला जाग आली. आता ती पूर्ण शांत झाली होती. ती सधन कुटुंबातील होती. घर स्लॅबचे होते. जमीनही बरीच. पण, नवरा सतत दारूच्या नशेत, म्हणून सासऱ्यांनी वेगळे काढलेले. दीर, नणंद पुण्यात. ती दुसऱ्याच्या शेतात काम करून पैसे कमवायची आणि नवरा ते दारूसाठी न्यायचा. पैसे दिले नाही की मारहाण करायचा. शेवटी असह्य झाल्यावर ती नवऱ्याची नजर चुकवून सकाळी घरातून निघाली व दूरपर्यंत चालून स्टॉपपर्यंत पोहोचली. रडत रडत ती मला म्हणाली, ‘‘मी तुमची सर्व कामे करीन. मला पगारही देऊ नका. फक्त माझ्या मुलाला तुम्ही शिकवा.’’

मी तिला शांत केले. सायंकाळी नाष्टा केला. तिचे भविष्य समजावून सांगितले. ‘मुलगा लहान आहे. शांत राहून निर्णय घे,’ असे समजावून सांगितल्यावर ती येथे असलेल्या तिच्या दिराच्या घरी जाण्यास तयार झाली. तिला खर्चासाठी थोडे पैसे देऊन तिची पाठवणी केली. दोन वर्षांनंतर अचानक ती भेटली. मला पाहून तिला खूप आनंद झाला. म्हणाली, ‘‘तुम्ही समजावून सांगितल्यामुळेच मी माझ्या संसारात सुखी आहे.’’ तिचा सुखी संसार पाहून आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sangita borge