भीती न आम्हा...

सौरभ तळेकर
Wednesday, 8 January 2020

महाराष्ट्रात साहसी पर्यटनाला खूप चांगले दिवस येत आहेत. पण, या पर्यटनाला गडपुनर्रचनेची जोड हवी.

महाराष्ट्रात साहसी पर्यटनाला खूप चांगले दिवस येत आहेत. पण, या पर्यटनाला गडपुनर्रचनेची जोड हवी.

तुमची आवड, पॅशन आणि जिद्द याचा मेळ साधता आला तर तुम्हाला ट्रेकिंगपासून कोणीच अडवू शकत नाही. रणवीर कपूरच्या ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाने मला ट्रेकिंगबद्दल आकर्षण निर्माण केले. घरापासून लांब, दोस्तीच्या दुनियेत फिरायचे, सगळा ताणतणाव घरी ठेऊन बुटाच्या लेस बांधायच्या आणि बॅग अडकवून चालायला लागायचे. एक मजा असते आपलेपण शोधण्यात. विसापूर माझा पहिला ट्रेक. मावळाची सुंदरता विसापूर आणि लोहगड या किल्ल्यांवर परिपूर्ण आहे. पावसाळ्यातील धबधबे या किल्ल्यांना शोभा आणतात. ट्रेकरला फिटनेस राखणे महत्त्वाचे असते. माझा सगळा आळस पहिल्या ट्रेकमध्येच उतरला. मांड्यांचे दगड होतात आणि आपण कुठे फसलो याचा पश्चात्ताप होतो. ट्रेकिंगचा एक फंडा मी या काळात शिकलो; ट्रेक करताना शरीर कितीही थकले, तरी डोके कधीही थकू द्यायचे नाही. नाहीतर, अपघात होण्याची शक्यता असते. विसापूरच्या नागमोडी आणि चिखलाच्या रस्त्यामुळे घसरून खूप वेळा पडलो. शेवटी गडावर पोचल्यावरचा आनंद ‘स्पेशल’ असतो. धुक्याचा गार वारा वाहत होता. विसापूरच्या ट्रेकमध्ये धबधब्याची डबकी लागतात. विश्वास बसणार नाही एवढे गार पाणी त्यात असते. या नैसर्गिक गार पाण्यात थकलेले शरीर सोडून द्यायचे, याचे एक वेगळेच सुख असते. तसेच पाणी हरिश्चंद्रगडावरही आहे. खाली उतरताना मन फुटत असते, पॉपकॉर्न फुटतात तसे. जेव्हा तुम्ही वरून खाली येत असता तेव्हा मानवी बुद्धी उत्साहात असते, असे विज्ञान सांगते. त्याचा अनुभव गड उतरताना प्रत्येकाला येत असतो.

एकदा ‘पेब’ किल्ला करायचा असे ठरले. यापेक्षा भयानक अनुभव नाही. रात्री बारानंतर अर्धा किल्ला चढलो. रात्री तीनला जेवण करून झोप काढली. सकाळी सातला पुन्हा चालायला सुरुवात केली. गडावर ना पाणी, ना काही खायला होते. भरउन्हाळ्यात दिवसभर फक्त दोन पाण्याच्या बाटल्या आणि तीन बिस्किटांवर आम्ही जिवंत होतो. उतरताना नको नको झाले होते. नंतर आयोजन करणाऱ्याला धुतला तो भाग वेगळा. ट्रेकिंग हा आताच्या काळात एक व्यवसाय बनलाय. ट्रेकमध्ये जबाबदारी घ्यावी लागते. वेगवेगळे ॲडव्हेन्चर्स ग्रुप ट्रेक आयोजित करतात. महाराष्ट्रात साहसी पर्यटनाला मोठे भविष्य आहे. स्थानिक मुले किल्ल्यांवर ‘गाइड’ असतात. गडाच्या पुनर्रचनेसाठी पर्यटन करायला हवे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by saurabh talekar