खरी कमाई

सीमा दाबके
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

मेहनतीने पैसे कमावले पाहिजेत हे खरेच, पण पैसे खर्च कसे, कुठे करायचे हेही कळले पाहिजे.

मेहनतीने पैसे कमावले पाहिजेत हे खरेच, पण पैसे खर्च कसे, कुठे करायचे हेही कळले पाहिजे.

स्वरदाच्या जोशी मॅडम रोज गजरा घालून शाळेत यायच्या. आज त्यांच्या केसात गजरा नव्हता. सानेमॅडमनी त्यांना विचारलेच, ‘‘काय आज गजरा नाही का?’’ त्यावर, तो गजरेवाला येतच नाही, असे मॅडमनी सांगितलेले स्वरदाने ऐकले. तिने ठरवले, आपण घरच्या फुलांचा गजरा मॅडमना द्यायचा. घरी आल्यावर तिने काही फुले व कळ्या काढल्या. छानसा गजरा केला. आईने विचारले, ‘‘आज चक्क शाळेत गजरा नेणार?’’ स्वरदा म्हणाली, ‘‘हो गं, आमच्या मॅडमना गजरा आवडतो ना, त्यांना देणार आहे.’’ तिने मॅडमना गजरा दिला. त्या पण खूप खूष झाल्या. स्वरदा रोजच गजरा देऊ लागली. तेव्हा मॅडम म्हणाल्या, ‘‘मी गजरेवाल्याला रोज दहा रुपये देत असे, ते पैसे तुला देते. पैसे घेतले तरच मी गजरा घेईन.’’ ‘‘पण मॅडम घरचीच फुले आहेत, पैसे नको.’’ ‘‘घरची फुले असली तरी तुझी मेहनत आहे ना. तेव्हा पैसे घे.’’ स्वरदाने पैसे घेतले. मॅडमनी ही गोष्ट मुख्याध्यापकांच्याही कानावर घातली होती व स्वरदाच्या आई-बाबांनाही सांगितली होती. आता इतरही दोन मॅडमनी तिला गजरे आणायला सांगितले. स्वरदाला रोज तीस रुपये मिळू लागले. बाबांनी समजावले, ‘‘हे पैसे तू तुझ्याकडे ठेव. हे पैसे कुठे वापरायचे ते तू ठरव. कारण ही तुझी खरी कमाई आहे.’’
रविवारी स्वरदा खेळायला जात असताना तिचे लक्ष समोरून येणाऱ्या कमलताईंकडे गेले. त्यांचा मुलगा व सून गेल्यापासून त्यांच्यावर त्यांच्या नातवाची जबाबदारी होती. तो सारखा आजारी असायचा. कमलताई घरकाम करून पैसे मिळवायच्या. पण नातवाच्या आजारपणामुळे त्यांना काही कामे सोडावी लागली होती. सरकारी दवाखान्यातून त्या औषध आणायच्या. तरी त्यांचा रोजचा खर्च पन्नास रुपये व्हायचा. तो त्यांना परवडत नसे. स्वरदा रस्त्यात थांबली. त्यांच्याशी बोलली व लगेच घरी आली. आई बाबांना म्हणाली, ‘‘हे पैसे मी त्यांना देऊ का? त्यांना त्याची गरज आहे.’’ हे ऐकून आई बाबांना आनंद झाला. तिच्या शिक्षकांनीही खऱ्या कमाईबद्दल तिला शाबासकी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by seema dabake