‘सवाईं’ना अभिवादन!

शकुंतला फडणीस
Wednesday, 11 December 2019

सवाई गंधर्व राहायचे, ते जुने घरही आता नाही. मग पाहुण्यांनी अभिवादन केले ते कोणाला?

सवाई गंधर्व राहायचे, ते जुने घरही आता नाही. मग पाहुण्यांनी अभिवादन केले ते कोणाला?

काही दिवसांपूर्वी टेक्‍सासमधील एक जोडपे भेटायला आले होते. आमचे नाते काहीही नाही. येण्यापूर्वी त्यांनी दोन वेळा फोन केला होता, तेवढीच फोनओळख फक्त. ते दोघे उच्चशिक्षित आणि रसिक. शि. द. फडणीसांचे चाहते या नात्याने ते आले होते. आणि मग आमचे वेगळेच नाते जुळले. गप्पांच्या ओघात मी त्यांना सहज सांगितले, ‘‘हे शेजारचं घर आहे ना, तिथे पूर्वी सवाई गंधर्व राहायचे. तेव्हा ते साधं एकमजली घर होतं, ते पाडून आता त्याच जागी मोठं अपार्टमेंट बांधलंय.’’
‘‘अच्छा! म्हणजे तुमची छानच ओळख असेल,’’ पाहुणे म्हणाले.
‘‘नाही. आम्ही इथे राहायला येण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. पण त्यांची पत्नी, कन्या प्रमिलाबाई, जावई डॉ. नानासाहेब देशपांडे यांच्याशी आमचा स्नेह होता.’’
‘‘त्यांच्या पत्नीही गात होत्या का?’’
‘‘नाही. त्या तशा अगदी साध्या होत्या. मात्र त्यांना भेटायला लहानथोर गायक यायचे. पंडित भीमसेन जोशी यायचे. कुमार गंधर्व, पु. ल. देशपांडेही. असे विशेष पाहुणे यायचे, त्या वेळी मलाही तिथे बोलावीत असत.’’

थोड्या वेळाने पाहुणे जायला निघाले. आम्ही त्यांना सोडायला चार पावले गेलो. रस्त्यावर आल्यानंतर पाहुण्यांनी शेजारच्या घराकडे बोट दाखवून विचारले, ‘‘इथेच सवाई गंधर्व राहायचे ना?’’
मी ‘होय’ म्हणाले. पाहुणे त्या घराच्या दिशेकडे तोंड करून उभे राहिले. डोळे मिटून त्यांनी हात जोडले. दोन-चार क्षण ते अगदी स्तब्ध राहिले. मग म्हणाले, ‘‘चला.’’ हे सर्व बघून मी थक्क झाले. पूर्वी सवाई गंधर्व राहायचे, ते जुने घर आता नाही. जुनी माणसेही हयात नाहीत. या नव्या घरात त्यांच्यापैकी कुणी राहतही नाही. मग पाहुण्यांनी कुणाला नमस्कार केला असेल? त्या परिसरात सवाई गंधर्वांच्या स्मृती कुठे तरी तरळत असतील.... त्यांना? की, कधी काळी निनादणारे संगीतचे सूर कुठे तरी रेंगाळत असतील... त्यांना? की, सवाई गंधर्वांच्या भावनिक अस्तित्वाला? त्यांच्या स्मृतीला असे आगळेवेगळे अभिवादन पाहण्याचा तो क्षण मला अविस्मरणीय वाटतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by shakuntala phadnis