गोरसधारी...

शीला मोघे
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

कोजागरी आली आणि आठवला रतिबाचे दूध देणारा दूधवाला. लहानपणापासूनचे दूधवाल्यांबरोबरचे आनंदक्षण आठवले.

कोजागरी आली आणि आठवला रतिबाचे दूध देणारा दूधवाला. लहानपणापासूनचे दूधवाल्यांबरोबरचे आनंदक्षण आठवले.

आमच्या शेजारच्या काकूंचा दूधवाला रोजच्या रतिबाचे दूध देतोच, शिवाय त्यांचा नातू छोटीशी वाटी घेऊन आजीच्या आधी पळत येतो. वाटी भरून दूध त्याला हवे असते. मामा त्याला दूध देतात. विनामूल्य. प्रेमाने. तेथे व्यवहार नाही! एकदा दूधवाला आला. ‘काकू दूध’असे ओरडणारा दूधवाला, त्यादिवशी ओरडला चक्क ‘काकू पाणी’. दोघेही मनसोक्त हसलो. म्हणाला, ‘‘काकू, येताना मित्र भेटला. त्याच्या शेतातील विहिरीला पाणी लागले. तो खूष होऊन सांगत होता. मलापण आनंद झाला. त्या आनंदात मी पाणी म्हटले.’’ आमचा एक दूधवाला ‘पाणीदार’ दूध द्यायचा. पण, त्याला सोडायचे नाही हा आमचा संस्कार! तो आम्हाला सोडत नव्हता व आम्ही त्याला. हळूहळू आम्ही त्याचे दूध कमी केले. दोन लिटरवरून पाव लिटरवर आलो. त्याचा एक विशेष म्हणजे तो आपणहून कधीच पैसे मागत नसे. दूध का कमी केले, हेही त्याने कधी विचारले नाही. पुढे त्याने नोकरी धरली. माझ्या मैत्रिणीकडचा दूधवाला रतीब घातल्यानंतर मैत्रिणीच्या तीन वर्षांच्या छोट्या मुलीला सायकलवर एक चक्कर मारून आणायचा. आमचा दूधवाला म्हैस व्याली की पहिल्या एक-दोन दिवसांत चीक आणून द्यायचा. आई रिकाम्या बरणीत गहू, ज्वारी भरून द्यायची, म्हशीला खाऊ घालण्यासाठी. या चिकाचा खरवस बनायचा.

एका काका शेतीवाडीवाले. घरचे दूध-दुभते असलेले. ते आमच्याकडे आणि आणखी एका-दोघांकडेच दूध घालायचे. त्यांचा तो काही व्यवसाय नव्हता. त्या काकू म्हणजे आमच्या आईची मैत्रीण. त्यामुळे दुधाबरोबर घरचा भाजीपाला, शेतमेवाही अधूनमधून पाठवायच्या. आमच्याकडे छोटीशी बाग होती. आई फुलांचे सुंदर गजरे गुंफायची. मग आईकडून गजऱ्याचा रतीब या मैत्रिणीच्या मुलीसाठी. दूध घेऊन येणाऱ्याबरोबर गजरा पाठवला जायचा. एकदा एका काकांकडून ताक आणताना पाय अडकून पडले. सगळे ताक भूमिगत. मी घाबरले. पुन्हा काकांकडे धावले. रडवेल्या चेहऱ्याने ताक सांडल्याचे सांगितले. त्यांनी मला जवळ घेतले, पाणी दिले, गुडघ्याला तेल लावले व बरणी भरून ताक दिले. बालपणीची दुःख किती क्षणभंगुर असतात ना..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sheela moghe