वन्सं नि वहिन्या

शिवानी लिमये
Tuesday, 10 December 2019

नणंद-भावजयीचं नातं लोकगीतात काही का असेना, लिमयांच्या घरात मात्र गेली पंचवीस वर्षे त्यांचे चांगलेच सूत जमले आहे. त्यांच्या भिशीची आज पंचविशी आहे.

नणंद-भावजयीचं नातं लोकगीतात काही का असेना, लिमयांच्या घरात मात्र गेली पंचवीस वर्षे त्यांचे चांगलेच सूत जमले आहे. त्यांच्या भिशीची आज पंचविशी आहे.

भिशीची पंचविशी आम्हाला वेगळाच आनंद देणारी ठरली आहे. तर त्याचे असे झाले, १९९५च्या डिसेंबरमध्ये माझ्या भाचीच्या लग्नात सर्व नातेवाईक जमलेले असताना ‘आपण फक्त लग्न-कार्यातच भेटतो, आपण वरचेवर भेटले पाहिजे’, या विचारातून ‘लिमये भिशी’ला सुरुवात झाली. लिमयांच्या माहेरवाशिणी आणि सुना यांनी महिन्यातून प्रत्येकीच्या घरी एकेकदा भेटायचे असे ठरवले. तेव्हापासून गेली पंचवीस वर्षे सातत्याने आम्ही नणंदा-भावजया भेटत आहोत. आता या भिशीत चार पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आम्हा सगळ्या जणींत अकृत्रिम स्नेह निर्माण झाला आहे. आपल्या चुलत-आते-मामे-मावस भावंडांना मुले ओळखत नाहीत, अशी अलीकडची परिस्थिती आहे. पण या भिशीमुळे आमच्या घरातील पुढच्या पिढीतील मुलेदेखील स्नेहाच्या धाग्याने बांधली गेली आहेत. एकमेकींच्या दुःखात, आनंदात सहभागी होतो. कोणी दवाखान्यात असेल, तर न सांगता आपसूक शक्य होईल ती मदत केली जाते. घरातल्या ज्येष्ठांचे वाढदिवस, साठी-पंचाहत्तरी उत्साहाने साजरी केली जाते. वर्षातून एकदा सहलीला जातो. नव्या सुनांचे, घरात येणाऱ्या नव्या बाळांचे स्वागत तेवढ्याच आपुलकीने केले जाते.

कोण उत्तम चित्र, रांगोळी काढते, कोण उत्तम भरतकाम करते, कोणी शैक्षणिक प्रगती केली, कोण खूप छान कलाकुसरीच्या, हस्तकलेच्या वस्तू बनवते अशा सगळ्या गोष्टींचे नुसते तोंडदेखले नव्हे तर मनापासून कौतुक होते. मी लिमयांच्या घरातील सर्वात धाकटी सून. माझे लग्न होईपर्यंत घरातील अनेक वडीलधाऱ्या व्यक्ती निवर्तल्या होत्या. मी अनेकांना पाहिले देखील नाही. परंतु भिशीला भेटल्यावर इतक्या वेळा सगळ्यांच्या आठवणी निघतात, की जणू मी त्या सगळ्यांना ओळखते असे आज वाटते. नुसत्या गप्पा आणि खाणेपिणे एवढेच आम्ही करत नाही, तर आम्ही आमच्या परीने समाजभान राखण्याचा प्रयत्न करतो. दरमहा काही रक्कम वेगळी ठेवून वर्षाअंती जिथे तिचा योग्य विनियोग होईल, अशा ठिकाणी देतो. नवीन पुस्तक वाचले असेल, तर त्या विषयी एकमेकींना सांगतो. दरमहा येणाऱ्या भिशीची आतुरतेने वाट पाहतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by shiwani limaye