श्रद्धा आणि भक्ती

श्रीपाद टेंबे
Wednesday, 22 January 2020

मंदिरापुढे खूप मोठी रांग दिसते. खरेच देवदर्शनाची एवढी ओढ असते? घरी देवघरात असतेच मूर्ती. तरीही दर्शनासाठी मंदिरातच जायला हवे?

मंदिरापुढे खूप मोठी रांग दिसते. खरेच देवदर्शनाची एवढी ओढ असते? घरी देवघरात असतेच मूर्ती. तरीही दर्शनासाठी मंदिरातच जायला हवे?

गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी दिसली. त्या जागृत गजाननाचे रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी प्रत्येकाची होणारी धावपळ आणि मनाची चलबिचल फक्त त्या गजाननालाच माहीत माणूस खरेच देव दर्शनासाठी आतुर असतो की, आपले म्हणणे सांगण्यासाठी आसुसलेला असतो? कोणाच्या मनात काय चाललेले आहे? हे आपल्या कोणालाच कळणार नाही. ते फक्त गजाननालाच कळत असेल. माणूस पण कसा असतो ना, ज्या वेळेस त्याला कोणत्याही गोष्टींसाठी मर्यादा येतात तेव्हा तो सर्व देवावर सोडतो आणि जे त्याला मिळते किंवा जमते ते केल्यावर मी ते केले किंवा ते करून दाखवले हे सांगत मिरवत बसतो. मंदिरासमोरची ती गर्दी पाहून वाटले, देशात लोक इतके शिकूनसुद्धा अशिक्षित तर नाही ना राहिले? हा प्रश्न पडण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे घरातली श्री गजाननाची मूर्ती असो वा मंदिरातील असो, शेवटी देव तर एकच आहे. जर भक्ती खरी असेल तर तर देव नक्कीच भेटणार आहे, मग तो कोणत्याही रूपात भेटेल त्यासाठी मंदिरातीलच गणपती किंवा इतर देवी देवतांचे दर्शन झालेच पाहिजे, असा अट्टहास कशासाठी?
या विषयातील मी तज्ज्ञ नाही. पण जे दिसते आणि आपल्या मनात जे कुजबुजत आहे ते या माध्यमातून मांडण्यासाठी काय हरकत आहे? आपण येणाऱ्या पिढीला काय शिकवणार आहोत? आपण देवाला माणसात बघायला शिकलो तर! देव सर्व बघतोच आहे आणि त्यालाच आपण ठरवू देऊ, काय बरोबर आणि काय चुकीचे? मला जे काही वाटते ते त्यालाच अर्पण करायचे, हे कार्य मी करतो आहे तेही एकदम प्रामाणिकपणे. तर मग त्यालाच ठरवू दे, मी काय पुढे करायचे? साक्षात देव आहे आणि देव समर्थ आहेच. आपणदेखील त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे. नाहीतर देव म्हणतील, सर्व तूच बोलतो आहे रे, मला पण थोडा वेळ देशील की नाही?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by shripad tembe