आतुलेनि सांडे...

श्रीरंग गोखले
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती स्वभावतः असावी लागते. मग सहजता हात पुढे होतो.

दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती स्वभावतः असावी लागते. मग सहजता हात पुढे होतो.

सकाळी लवकरच रिक्षा स्टॅंडवर गेलो. स्टॅंडवर एकही रिक्षा नाही! एक तरुण आधीच उभा होता रिक्षेसाठी. म्हणजे त्यानंतर मला रिक्षा मिळणे दुरापास्तच. ‘उबेर रिक्षा’ मागवावी असा विचार मी करीत होता. तसे करायला गेलोही, तर नेटच नाही. दहा मिनिटे वाट पाहून परत जायचे ठरवीत होतो. तेवढ्यात विरुद्ध बाजूने एक रिक्षा आली. हातातल्या काठीने इशारा केल्यावर माझ्याजवळ थांबली व मी रिक्षात बसलो. रिक्षा चालू करण्यापूर्वी रिक्षावाल्याने बाहेर पाहून मला विचारले, ‘‘यांना विचारा, कुठे जायचेय?’’... तोवर तेथे एक प्रौढ गृहस्थ दोन्ही हातांत दोन पिशव्या सावरीत येत उभे राहिले. त्यांना केईएमला जायचे होते. आम्हाला तिकडे जायचे नव्हते. पण ‘‘आपण तिकडे नाही जाणार, पण यांना वाटेत एखाद्या रिक्षापर्यंत सोडू,’’ असे रिक्षावाले म्हणाले. पुढे थोड्या अंतरावर त्या प्रौढ गृहस्थांना रिक्षा मिळाली. अशी कृती रिक्षावाले आपणहून करीत नाहीत, म्हणून मला कौतुक वाटत होते.

रिक्षावाल्यांशी गप्पा मारायला मला नेहमी आवडते. आज रिक्षा कमी कशा, सण, ही शाळेची वेळ असे विषय निघाले. रिक्षावाले म्हणाले, ‘‘माझीही शाळेची रिक्षा आहे, पण आता सकाळची ट्रीप संपली. आता अकरा वाजता पुन्हा जायचे.’’ ते रिक्षावाले सिंहगड रस्त्यावरच्या धायरी भागातून तीन मुलांना कोरेगाव पार्क येथील शाळेत घेऊन जातात. पाच वाजता परत आणतातही. तीनही मुले अंध आहेत. हुषार आहेत. या मुलांसाठी नुकसान सोसून ते ही सेवा देतात व खूप समाधानी आहेत. जमेल तसे त्या शाळेला मदतही करतात. मला खरोखरीच धन्य वाटले. चला, दुसऱ्या प्रवाशाला सोडूया असे सहजपणे म्हणणाऱ्या रिक्षावाल्यांच्या आपद्‌धर्माची बीजे त्यांच्या सहृदय प्रवृत्तीत व संस्कारात होती. आजची सकाळ धन्य झाली!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by shrirang gokhale