आठवले इतकेच!

सुदाम कृष्णाजी विश्‍वे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

पुण्यात कधीही रस्त्यावर गर्दी असते. निवांतपणा असा आता उरला नाही, अशी तक्रार लोक करू लागले आहेत. अशा वेळी रस्त्यावर निवांतपणा पाहताना मन काही वर्षे मागे गेले.

पुण्यात कधीही रस्त्यावर गर्दी असते. निवांतपणा असा आता उरला नाही, अशी तक्रार लोक करू लागले आहेत. अशा वेळी रस्त्यावर निवांतपणा पाहताना मन काही वर्षे मागे गेले.

काही कामानिमित्त गोखलेनगरपासून डेक्कन जिमखान्याकडे जायचे होते. भांडारकर रस्त्याने निघालो आणि आश्‍चर्याचा धक्काच बसला. रस्त्यावर वाहतूक अगदीच कमी होती. आठवले, ऐंशीच्या दशकात पुण्यात फारशी रहदारी नसे. आम्ही मुले आपटे प्रशालेत जाताना पायीच जात असू. बसने जाणारा, पास काढून जाणारा एखादाच असे. त्याला आम्ही खूपच श्रीमंत आहे असे समजत असू. रस्त्याने पायी जाताना क्वचितच एखादी सायकल, एखादी बस, एखादी दुसरी दुचाकी दिसत असे. त्या वेळचे पुणे सायकलींचे पुणे, पेन्शनरांचे पुणे, विद्येचे माहेरघर अशा विशेषणांनी सजलेले होते. पुण्यातील अनेक रस्ते मला आठवतात. मी आणि माझा अत्यंत जीवलग मित्र (कै.) शिरीष देशमुख निसर्गचित्रे काढण्याच्या निमित्ताने दर रविवारी सायकलीने निघत असू. आज काय तर सिंहगड रस्ता, उद्या सोलापूर रस्ता, तर कधी शेतकी महाविद्यालय, पुणे विद्यापीठ असे जात असू व एखादा चांगला स्पॉट मिळाला, तर तेथे बसून जलरंगातील निसर्गचित्र काढून सायंकाळी परतत असू.

सिंहगड रस्त्यावर त्या वेळेस दोन्ही बाजूंनी खूपच छान झाडे होती. कितीही ऊन असले तरी जाणवत नसे. रहदारी तुरळक असे. सोलापूर रस्त्यावर अगदी थेऊरच्या गणपती, उरुळीकांचन येथपर्यंत आम्ही जायचो. अपघाताची काहीच भीती नसायची.
शेतकी महाविद्यालय हे तर आम्हा अभिनव कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे रेखांकनासाठीचे माहेरघरच असायचे. शिवाजीनगर एस. टी. स्टॅंडवर आम्ही संध्याकाळच्या वेळी स्केचिंगसाठी जायचो. बरीच खेडूत मंडळी आपापल्या बसची वाट पाहत पेंगुळली असायची. अशा लोकांची स्केचिंग माझा मित्र खूपच छान काढायचा. पुणे विद्यापाठामध्ये तर दर रविवारी आम्ही जात असू. अत्यंत निर्मनुष्य असा रस्ता, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी, पायी जाणारे, येणारे विद्यार्थी असेच चित्र दिसायचे. आम्ही अनेकदा भूगाव, पौड या रस्त्याला देखील जायचो. मन खूपच प्रसन्न होत असे. आज आठवले इतकेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sudam vishwe