जरंडेश्वर

सुहास पाकणीकर
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

तरुण वयात नसते धाडस करायला जातो आपण. पण, आयत्यावेळी मदत मिळाल्याने त्यातून पारही पडतो.
 

तरुण वयात नसते धाडस करायला जातो आपण. पण, आयत्यावेळी मदत मिळाल्याने त्यातून पारही पडतो.
 
आम्ही काही मित्र आठ वर्षे कूपर इंजिनीरिंग येथे काम करीत होतो. त्या वेळी जरंडेश्वर ‘पर्वता’वरील हनुमान मंदिरात गेलो होतो. मूर्च्छित लक्ष्मणावरील उपचारांसाठी हनुमान द्रोणागिरी हातांत घेऊन घाईघाईने परतत होता. तेव्हा त्या पर्वताचा एक भाग खाली पडला, तोच हा जरंडेश्वर पर्वत. म्हणूनच तेथे एक हनुमानाचे सुंदर मंदिर आहे. जरंडेश्वराचा डोंगर चढून जाणे अवघड आहे. कारण, त्याचा चढ जवळ जवळ उभा आहे. त्या डोंगराची वळणवाट आम्ही कशीतरी चढून गेलो होतो. त्यातून आम्ही संध्याकाळी निघालेलो होतो. त्यामुळे डोंगरावर पोचेपर्यंतच अंधार झाला. मंदिरात जाऊन प्रथम हनुमानाचे दर्शन घेतले. तोवर तेथील भागवतांनी जेवणाची पंगतच बसवली. त्यांनी जेवणाचा खूप आग्रह केला. त्यांचा आग्रह मोडवेना, त्यामुळे एक तास कसा गेला तेही कळले नाही. मग त्यांनीच आम्हाला विचारले, ‘‘आता अंधारात कसे जाणार? तुमच्याबरोबर बॅटरी आहेत का?’’ परंतु आमच्याबरोबर काहीच नव्हते. ते म्हणाले, ‘‘हा डोंगर उतरताना पाय घसरून पडण्याची शक्यता असते. अंधारात वाट नीट दिसणार नाही. पण काही काळजी करू नका. मी तुम्हा प्रत्येकाला एक कंदील देतो. त्यामुळे तुम्हाला वाट उतरण्यास अवघड जाणार नाही. खाली गेल्यावर हे कंदील तुम्ही गावांतील सायकलच्या दुकानांत नेऊन द्या, म्हणजे मला उद्या परत मिळतील. मी तुम्हा सर्वांना चांगले ओळखतो. कारण तुम्ही आपल्या कंपनीतच इंजिनीअर म्हणून काम करता याची मला कल्पना आहे. तसेच तुमच्यातील काहीजण आमच्या दुकानातून सायकली घेऊन साताऱ्यास जातात, हेही मला माहीत आहे.’’

त्यांचे गावातील सायकलचे दुकान रात्री उशिरापर्यंत उघडे असते हे आम्हाला माहीत होते. त्यामुळे रात्रीच त्यांचे सर्व कंदील त्या दुकानात परत केले. तरीही त्यांनी आम्हाला केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार कसे मानावे हेच कळत नव्हते. कंदिलाच्या उजेडात आम्ही सगळे सुखरूप डोंगर उतरून खाली आलो होतो. एरव्ही आमचे नसते धाडस अंगाशीच आले असते. त्यांच्या मदतीचे मोल काही पैशांत होऊ शकत नव्हते. खूप वर्षे झाली या घटनेला, पण त्या रात्री आम्हाला मंदिराच्या भागवतांनी केलेल्या मदतीचे अजून स्मरण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by suhas paknikar