परीक्षा अन्‌ दर्शन 

सुलभा सांडभोर 
Tuesday, 24 December 2019

देवीदर्शनाला निघालो आणि तिने परीक्षा घ्यायला सुरुवात केली जणू. पण, तिच्यावरची श्रद्धा कायम होती. परीक्षेनंतर तिने दर्शनही दिले.

दहा जणी प्रवासाला निघालो. प्रथम कोल्हापूर, तुळजापूर, माहूर व नंतर वणीची देवी अशा प्रकारे प्रवास करायचा होता. गाडीमध्ये सकाळ-संध्याकाळ आरत्या करायच्या, मंत्र म्हणायचे. गाडीतच नाश्‍ता. कोल्हापूर जवळ पोचताना गाडी पंक्‍चर. पहिली अडचण. आम्ही मंदिरात गेलो. ड्रायव्हरने गाडीचे पंक्‍चर काढून आणले. जेवण उरकून पंढरपूरला निघालो. मुक्काम सोलापूरला मैत्रिणीच्या बहिणीकडे. सकाळी लवकर उठलो. त्यांच्या बंगल्यातच देऊळ असल्यामुळे आम्हाला काकड आरतीचा लाभ मिळाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अक्कलकोट येथे जात असताना परत आमची गाडी पंक्‍चर. पंक्‍चर काढून अक्कलकोट गाठले. तुळजापूरला निघालो तर पुन्हा पंक्चर. देवी आमची परीक्षा घेत होती की काय? तुळजापूरपासून तीस किलोमीटर अंतरावर गाडीचा पाटा तुटला. रस्ता निर्जन. संध्याकाळ होत आलेली. रस्त्यावर एकदम शुकशुकाट. आम्ही सगळ्या बायका तिथे होतो. ड्रायव्हर गाडी सोडून गॅरेज शोधायला गेलेला. त्याला त्याच्या किलोमीटरप्रमाणे पैसे देऊन आम्ही मोकळे झालो. त्याचा खूप राग आला होता. काय करावे हेच कळत नव्हते. आमच्यातल्या दोघी रडायला लागल्या. काही म्हणाल्या, ‘‘पुरे झाले. आपण आता पुण्याला जाऊया.’’ मनात काहूर माजले होते. इतक्‍यात एक ट्रक आला. त्या ट्रकमध्ये वीस-बावीस वर्षांची मुले. मुले ट्रकच्या टपावर जाऊन बसली. खूप प्रयत्न करून सगळ्याजणी ट्रकमध्ये बसलो. बॅगा टपावर ठेवल्या. कोणाच्याही बॅगेला कुलूप नव्हते. पण, कोणाचीही कुठलीही वस्तू हरवली नाही. अशा परिस्थितीत आम्ही नित्यनेमाच्या संध्याकाळच्या आरत्या म्हणालो. तुळजापूर गाठले. गुरुजींना प्रथम गाडीची सोय करायला सांगितली. त्यांनी आम्हाला गाडी करून दिली. देवीच्या कृपेने आम्हाला पुण्यापेक्षा एक रुपया कमी दराने गाडी मिळाली. रात्री फोन चार्ज करून दुसऱ्या दिवशी सकाळी घरच्यांना सर्व काही सविस्तर सांगितले. रात्री तुळजाभवानी मातेचा छबीना बघून परत गुरुजींच्या घरी आलो. पुढचा सर्व प्रवास निर्विघ्न पार पडला. गाणगापूर, अंबजोगाई, परळी वैजनाथ, औंढ्या नागनाथ करून माहूरला आलो. वणीच्या सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. या गाडीचा ड्रायव्हर होता विठ्ठल. खरोखरच माउलीसारखा आमच्यासाठी धावून आलेला.

मुक्तपीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write Sulbha Sandbhor