आमच्या चिऊताई

सुमेधा सरदेसाई
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

चिमण्या परत भेटल्या खूप दिवसांनी. त्यांना दाणा-पाणी सुरू केले आणि अडीच वर्षे त्यांच्या संगतीचा आनंद लुटला.

चिमण्या परत भेटल्या खूप दिवसांनी. त्यांना दाणा-पाणी सुरू केले आणि अडीच वर्षे त्यांच्या संगतीचा आनंद लुटला.

काही कालावधीसाठी दुसऱ्या ठिकाणी राहावयास आलो. मागच्या बाजूला पर्वतीचे पटांगण. आजूबाजूला वृक्षराजी. अचानक दूर झाडावर पाच-सात चिमण्या खेळताना दिसल्या आणि मन सुखावले. कुठे इतकी वर्षे हद्दपार झाल्या होत्या माहीत नाही. पण, अनेक वर्षांनी त्यांचे दर्शन झाले. आम्ही खिडकीबाहेरच्या रॉडवर आच्छादन घातले. त्यावर बाजरी घातली. पातेल्यात पाणी ठेवले. त्या लगबगीने आल्या. त्यांच्यात पाच-सहा सख्यांची भर पडली. दोन-चार दाणे चोचीत घेऊन झाडावर जात होत्या, परत येत होत्या. पंधरा-वीस मिनिटांचा त्यांचा खेळ चालला होता. मग उडून गेल्या. रोज पहाटे उजाडताना, नंतर दहाच्या सुमारास आणि संध्याकाळी पाचच्या सुमारास येऊन त्या दाणे खाऊ लागल्या. पाण्यात डुंबू लागल्या. इतक्‍या मुलखाच्या घाबरट की, आम्ही थोडे लांब गेल्यावरच त्या यायच्या. त्यांची संख्या हळूहळू चाळीस-पन्नासपर्यंत गेली होती. दोन-तीन इवलीशी पिल्ले मागे झाडावर असायची. त्यांचे आई-वडील त्यांना भरवायचे. आठ दिवसांनी मोठी होऊन ती स्वतंत्रपणे येऊ लागली.

जसा उन्हाळा सुरू झाला, तशी स्थलांतरित चिमण्यांची संख्या वाढू लागली. आता दोनशे-अडीचशेपर्यंत चिमण्या येऊ लागल्या. त्यात चार पाच जोडप्यांची तोंडे हळद लावल्यासारखी जर्द होती. त्या वेगळ्या उठून दिसत होत्या. तरी सगळ्या एकत्र होत्या. सगळ्यांचे काम एकदम शिस्तबद्ध. कधीही, कोणीही एकमेकांच्यावर आदळले नाही. धडकले नाही. चार-पाच चिमण्या येऊन दाणे घेऊन झाडावर गेल्यावरच पुढच्या येत होत्या. मी आधी-तू नंतर असे नाही. एकमेकांवर ओरडणे नाही. ऐकू येतो तो फक्त त्यांचा मंद स्वरातला चिवचिवाट. कपडे वाळत घालण्यासाठी दोरी आहे. त्यावर बसतात तेसुद्धा रांगोळीतले ठिपके काढावे एवढ्या अंतरावर. मध्येच कबुतरे येऊन त्रास देऊ लागली. गुंडच जणू. त्यामुळे आता लक्ष ठेवायला लागते. कबुतरांना सारखे हाकलल्यामुळे ती पुढे येत नाहीत. चिमण्यांच्या अंगात थोडा धीटपणा आला आहे. आम्ही असताना कबुतरांना न घाबरता त्या पुढे येतात. या चिमण्यांच्या संगतीत अडीच वर्षे काढल्यावर आता आमचा नवीन घरात जायचा योग आला आहे. एवढाच आमचा ऋणानुबंध.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sumedha sirdesai