क्षण सुवासिक

सुनील मांजरे
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

निवृत्तीनंतर करायचे काय, हा प्रश्‍नच पडत नाही काहींना. ते नव्या उपक्रमांत स्वतःला गुंतवून घेतात.

निवृत्तीनंतर करायचे काय, हा प्रश्‍नच पडत नाही काहींना. ते नव्या उपक्रमांत स्वतःला गुंतवून घेतात.

लहानशा गावात शिक्षक म्हणून नोकरीला लागलो आणि आता निवृत्तिवेतनाची पहिली रक्कम हातात पडली. लहान मुलामुलींमध्ये रमताना, त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना मन मोकळे होत होते. गुबगुबीत चेहऱ्यांवरील ते हास्य कधी लांब जाऊ नये असे वाटत असताना आज निवृत्तिवेतनाचे पाकीट हातात पडले. हृदयापासून या मुलांमध्ये कसे रमता येईल याचा विचार केला. मग तालुक्‍यात किती शाळा आहेत, त्याची आकडेवारी मिळवली. माझे निवृत्तिवेतन किती व माझ्या गरजा किती, याचा विचार केला. गणित जुळले. तालुक्यातील एका शाळेस दरमहा भेट द्यायची. निवृत्तिवेतनाच्या पाच टक्के रक्कमेची नवनवीन पुस्तके घ्यायची आणि ती या लहान मुलांसाठी वाटायची. इतर वेळी व्यक्तिमत्त्व विकासावर अर्धा-पाऊण तास वर्गात समायोजन करायचे. या गोष्टी करता करता वेळ कसा निघून जात होता कळत नव्हते.

जवळपास एक तप हा उपक्रम चालू ठेवताना अनेक मित्रांकडूनही सहकार्य मिळाले. विद्यार्थी विकास योजनेसाठी एक दहा पानी पुस्तिका पदरमोड करून तयार केली. जवळच्याच वाडीतील एक शाळा दत्तक घेतली. तेथील पहिलीच्या विद्यार्थ्यापासून दहावीपर्यंत शिकणाऱ्यासाठी विकसन मालिका तयार केली. खर्चाची तमा बाळगली नाही. तरी मित्रांना माझा हा स्तुत्य उपक्रम लक्षात आल्याबरोबर त्यांनी मला निम्मी रक्कम गोळा करुन दिली. निम्मा खर्च त्यांनी उचलल्याने हातभार लागला आणि त्यांनाही आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो आहोत ही जाणीव झाली. माझ्या कार्याची तालुक्‍यात वाहवा होऊ लागली. आतापर्यंत साठ शाळांना पुस्तके आणि व्यक्तिमत्त्व विकासमालिका पुस्तिकांचे वाटप करून मी आनंदात आहे. या परिपाठात खंड पडलेला नाही. विद्यार्थी विकसनाचा सुगंध आसमंतात उसळी मारीत आहे. चोहोबाजूंना तो पसरला आहे. फुलांच्या ताटव्याचं वाऱ्याशी धसमुसळेपणा चालू असतो. आणि त्याच्यातील सुगंध चहू दिशांना पसरतो. माझ्याही मनातील आनंद असाच चोहीकडे उसळी मारत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by sunil manjre