एक विवाह असाही...

स्वाती धर्माधिकारी
मंगळवार, 9 जुलै 2019

लग्न हा दोन घरे जोडणारा आनंदसोहळा असतो; पण आसपासच्या इतरांनाही आनंदसुख देण्याचा प्रयत्न करता आला तर...

लग्न हा दोन घरे जोडणारा आनंदसोहळा असतो; पण आसपासच्या इतरांनाही आनंदसुख देण्याचा प्रयत्न करता आला तर...

नुकतेच लेकाचे लग्न ठरले, तेव्हा आत्तापर्यंत व्यावसायिक व्हिडिओ-फोटोग्राफर म्हणून गेलेल्या प्रत्येक लग्नातील पाहिलेल्या व माझ्या मनातल्या सुप्त इच्छा उसळी मारून आल्या. मी एक नवनिर्वाचित सासू दिवास्वप्ने बघायला लागले. पत्रिका कशी, लग्न कुठे, देणे-घेणे, आहेर इत्यादी कोडी जमतील तशी माझ्या परीने सोडवायचा प्रयत्न करू लागले आणि "अहों'नी पहिला बॉंब टाकला. "लग्न अतिशय साधे करायचे! मानपान, देणे-घेणे, सगळे कट. केळवण घ्यायचेच नाही. लोकांकडून रोखीने आहेर घेऊन त्यात आपली रक्कम घालून गरजूंना मदत करायची.' झाले! मतभेदांना सुरवात झाली. गरमागरम चर्चा तडतडू लागल्या. पहिली नियमावली फक्त सासूसाठी-अस्मादिकांसाठी! सर्व प्रकारचे मानपान कट, सर्व मागण्या रद्द, कुठल्याही मार्गाने (आडून-इकडून- तिकडून) आई-भावंडांकडूनसुद्धा आहेर घ्यायचा नाही. कुठलेही साधे जेवण (केळवण)सुद्धा घ्यायचे नाही? गरजूंच्या मदतीला माझी ना नव्हती, पण मीही "गरजू'च नव्हते का? सासू मानाची भुकेली, हे कळायला नको का ह्यांना? पण काही चालत नाही म्हटल्यावर माझ्यातील सासूचा हट्ट हळूहळू मावळला.

दुसरीतल्या माझ्या नातीने हस्ताक्षरात पत्रिका लिहिली. ती ह्यांनी व्हिडिओ स्वरूपात सर्वांना पाठवली. केळवण फक्त आईचे घेतले. प्रत्यक्ष लग्न नागाव बीचवर ठरवले; पण ऐनवेळी भरती कमी झाली नाही म्हणून जागा थोडी बदलली. मुहूर्त गाठण्यासाठी वधू-वरांना वाडीतील एका तात्पुरत्या मचाणावर उभे करण्याचा समयोचित निर्णय घेतला. लग्नानंतरचे विधी समुद्रकिनाऱ्यावर रम्य संध्याकाळच्या सुंदर समयी झाले. विवाहसोहळा पंचमहाभूतांच्या साक्षीने घडला. स्वागत समारंभही आगळा-वेगळा होता. आम्ही उभयतांनी जुन्या काळातले पोशाख परिधान केले. लोकांना मोठ्या पडद्यावर लडाखची सायकल सफर, खिद्रापूरचे देऊळ, वधूवरांचे एक गाणे दाखवले. लॉनवर स्टॅंडीज ठेवले. त्यावर पर्यावरण व आरोग्य रक्षणाची माहिती मांडली. जमा झालेल्या आहेरात भर घालून गरजू विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा संकल्प केला. मुलाच्या लग्नाचा सोहळा इतरांनाही आनंद देणारा, स्मरणात राहणारा असा झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by swati dharmadhikari