दप्तराचा भूतकाळ

स्वाती साखरकर
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

आजच्या सॅकमधला रुक्षपणा अगदी खटकतो. चुकूनही त्याला दप्तराचा प्रेमळ गंध येत नाही.

आजच्या सॅकमधला रुक्षपणा अगदी खटकतो. चुकूनही त्याला दप्तराचा प्रेमळ गंध येत नाही.

पूर्वीचे दप्तर नसेलही ठरावीक, साचेबद्ध. ती पिशवी असली तरी तिच्याशी शालेय वयात असलेला भावनिक संवाद हा जाणवणाराच असायचा. घरातील मोठे देतील तेच दप्तर. कधी गळ्यात अडकवायचे, तर कधी हातात धरून चालावे असे दप्तर म्हणजे अगदी जिव्हाळ्याची वस्तू. जणू सारे शालेय जीवनच या दप्तराने व्यापून टाकलेले होते. रोजचे वजनदार दप्तर शनिवारी अगदीच अर्ध्या शाळेप्रमाणेच हलके फुलके. रविवारी याला सुट्टी. धुऊन वाळवून ते स्वच्छ अगदी टवटवीत व्हायचे. शाळेतले दप्तर अगदीच साधे. एखादे उजळणीचे पुस्तक अन् पाटी, लेखणी एवढाच त्याचा आवाका. मोठेपणाचा आव नाही, गरीब-श्रीमंतीची तुलना नाही. हे दप्तर बघताना आठवते, कधी चिंच-आवळा दप्तरात दिसला तर आईचा हमखास पाठीवर धपाटा ठरलेला. दप्तर हा प्राथमिक जीवनातील खजिनाच. शंख, शिंपले, गारगोट्या, चिंचा, बोरे, आवळे, रंगीत लेखनासाठी खडू वगैरे सारे हमखास लपवण्याचे ठिकाण म्हणजे हे दप्तर. दप्तराला चुकून पाय लागला तर ‘पाया पड’ म्हटले जायचे आणि खरोखरच नमस्कार केला जायचा. किती आदराचा भाग होता हे दप्तर! शाळा सुटताना हमखास एकदा तरी पाऊस गाठणारच आणि या वेळी सर्वात कसरत करावी लागायची ती पावसापासून दप्तराला वाचविण्याची.

शाळा दूर असो वा जवळ, गळ्यात दप्तर अडकवून चालताना कधी त्याचे ओझे वाटले नाही. दप्तरातले पुस्तक फाटलेले असेल, पण ते मनाच्या कोपऱ्‍यात घट्ट रुतून बसले. पाटी फुटलीही असेल, पण अक्षरे मनात कोरली गेली. ते दप्तर एक सजीवच वाटायचे. त्याला जपले आणि त्यातच बालपण किती छान रमले. शाळा सुटली अन् दप्तरे खुंटीवर लटकायला लागली. जणू सारे बालपणच खुंटीवर लटकत होते, खुणावत राहिले. शालेय जीवनात विलक्षण जवळचे वाटत राहिले दप्तर. आजच्या सॅकमधला रुक्षपणा अगदी खटकतो. खांद्यावरची आकार, उकार नसलेली ती सॅक अन् त्या आत पण अस्ताव्यस्तपणे पडलेली पुस्तके अन् वह्या. चुकूनही त्याला दप्तराचा प्रेमळ गंध येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by swati sakharkar