नदीकिनारी

स्वाती सामक
Tuesday, 14 January 2020

जलतत्त्वाची ओढ आतूनच, त्यामुळेच नदीशी नाते जुळत गेले असावे. नदीच्या ओढीनेच मी हिंडत असते जणू.

जलतत्त्वाची ओढ आतूनच, त्यामुळेच नदीशी नाते जुळत गेले असावे. नदीच्या ओढीनेच मी हिंडत असते जणू.

भारतभर हिंडताना गावाच्या आधी लक्षात राहिल्या त्या नद्या. मध्य भारतात नर्मदेच्या विशाल पात्राएवढीच क्षिप्रा लक्षात राहिली ती तिच्या सुंदर नावासाठी. हरिद्वारचे गंगेचे महाविशाल पात्र, गंगेची होणारी आरती आणि प्रवाहात सोडले जाणारे दीपद्रोण शेवटच्या सरत्या क्षणी जाणीवेच्या पार जाताना डोळ्यांसमोर ते दृश्य राहावे अशी तीव्र इच्छा आहे मनात. त्या मानाने यमुनेने मात्र निराशाच केली.
आग्र्याला ‘यमुनेकाठी ताजमहाल’ गुणगुणत ताजमहाल पाहायला गेले. ऐकले होते की यमुनेच्या पात्रात ताजमहाल प्रतिबिंबित होतो. पण, कालौघात यमुना कोसो दूर गेली आहे. तर गोकुळात ‘कालिंदीच्या तटी खेळतो गोपसुतांचा मेळा’ हे गाणे मनात होते. पण, कालियाच्या कालकूटाने काळीभोर झालेली ती कालिंदी भेटलीच नाही. दक्षिणेकडच्या तुंगभद्रा, कृष्णा, गोदा त्यांच्यातील गोल होड्यांमुळे मनात ठसल्या. गोव्यात समुद्राला भेटणारी मांडवी आणि झुआरी दोघी गोव्याचे निसर्गसौंदर्य वाढविणाऱ्या. महाबळेश्वरातील पाच नद्यांचे उगमस्थान पाहिले अन् कऱ्हाडचा आशिया खंडात एकमेव गणला जाणारा कृष्णा-कोयनेचा अनोखा प्रीतिसंगमपण पाहिला. वाईचे घाटाघाटावरचे कृष्णामाईचे उत्सव अनुभवले, त्रिपुरी पौर्णिमेला घाटावरची देवळे झगमगलेली नाशिकच्या व्हिक्टोरिया ब्रिजवरून याची देही अनुभवली.

लहानपणी मालेगावला गिरणा मौसम नद्यांच्या पाण्यात डुंबायला मिळते म्हणून गल्लीतल्या मुलीबरोबर जाऊन तिला धुणे धुवायला मदत केली आहे आणि त्यासाठी अक्काचा मारही खाल्ला आहे. होळकर ब्रिजवरून मोसमला चुकूनमाकून येणारा पूर पाहिला आहे. सुट्टीत नाशिकला घारपुरे घाटावर पोहायला शिकले, पुरात व्हिक्टोरिया ब्रिजवरून बिनधास्त उड्या मारून दुतोंड्या मारुतीपर्यंत पोहत जाणाऱ्या काका लोंकांचे वेडे धाडस जीव मुठीत धरून पाहिले. अनेक प्रियजनांना रामकुंडात तिलांजली दिली. प्रत्येक गावचे पुराचे मापदंड वेगळे. नाशिकचे दुतोंडेया मारुती, नारोशंकर घंटा हे मापदंड.

न पाहिलेल्या अनेक नद्यांबद्दलही मनात खूप प्रेम आहे. नर्मदा पाहिली, पण भेडाघाट नाही पाहिला. पंढरपूरला गेले, पण विठ्ठलप्रिय अबीराच्या काळ्या रंगाची काळीशार चंद्रकोरीसारखी वळण घेणारी चंद्रभागा नाही भेटली. एक खरे, गेली पंचेचाळीस वर्षे पुण्यात राहात आहे, पण मुळा-मुठा कधी आपल्या वाटल्या नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by swati samak