कडुलिंबाचं झाड आणि ती

उज्ज्वला काळभोर
Friday, 13 March 2020

कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेल्या आजोबांनी शहाणपणाचा वारसा नातीला दिला. नात मोठी झाली, तरी तिला ओढ त्या झाडाखालील पाराचीच.

कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेल्या आजोबांनी शहाणपणाचा वारसा नातीला दिला. नात मोठी झाली, तरी तिला ओढ त्या झाडाखालील पाराचीच.

ती तिच्या आईची तिसरी मुलगी. अतिशय अनिच्छेने घरातील मंडळींनी तिचा स्वीकार केला. फक्त आजोबांनी तिचा जन्म आनंदाने स्वीकारला. या लहानीकडे घरातील बायकांनी जणू काही पाठच फिरवली होती. तिला सांभाळून आईला घरातील, गोठ्यातील काम करणे शक्‍य होईना. ही गोष्ट आजोबांच्या लक्षात आल्यावर लहानीला सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. आजोबांच्या मांडीवर समाजसेवेचे धडे तिने घेतले. आजोबांना मार्गदर्शन करताना, वाद मिटवताना पाहिले. दानधर्म करताना पाहिले. गोसाव्याला दररोज पीठ देताना पाहिले, वासुदेवाला सूपभर धान्य देताना पाहिले. देण्याची दानत तिने आजोबांच्या सान्निध्यात अनुभवली. शाळेत आल्यावर घडलेल्या गोष्टी सांगायची तिची ती हक्काची जागा होती. नकळतपणे समजूतदारपणाचे बाळकडू तिला मिळत गेले. मुली पदरी असल्याने त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी स्वतःच्या शेळ्या पाळून त्याआधारावर मुलींच्या नावाने विमा उतरविणारी आईची दूरदृष्टी अनुभवली. खट्याळ सासूप्रमाणे आजीचे बोलही ऐकले. ‘‘माहेरी जाताना तुझ्या शेळ्याही सोबत घेऊन जा. तू गेल्यावर त्यांना दाणापाणी कोण करणार?’’ यावर आजोबा व आईचे स्मितहास्यही पाहिले. काहीही न बोलता खूप काही सांगता येते व करता येते हा बोधही घेतला.

लहानी मोठी झाल्यावर लग्न ठरले. तोवर आई जग सोडून गेली होती. त्यामुळे आईची भूमिकाही आजोबांनी पार पाडली. आजोबांनी सासरची जबाबदारी समजावताना प्रेमाने एका रोपट्याचे उदाहरण दिले. एक छोटेसे रोपटे कुंडीतून जमिनीत लावताना लावणाऱ्याने काळजी घ्यावी लागते. कुंडीतच आपले विश्‍व शोधणाऱ्या रोपट्यालाही मोकळ्या मातीत स्वतःला सामावून घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. स्वतःच खंबीर व्हावे लागते. कारण मायेच्या सावलीत वाढलेल्या रोपट्यावर आता दुसऱ्यांवर सावली धरण्याची जबाबदारी आलेली असते. दुसऱ्यांना सुख, आनंद, फुले-फळे देताना आपोआप ते लहानसे रोपटे आपले कुंडीतले जीवन विसरू लागते. कारण त्याचे विश्‍व बदललेले असते. सासरी आल्यावर ह्या रोपट्याची गोष्ट सारखी आठवत असायची. रोपट्याचा वृक्ष झाला, पण आजही माहेरी गेल्यावर ओढ असते ती त्या लिंबाच्या झाडाखालील पाराची. आज त्यावर बसायला सोबत कोणीच नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by ujjwala kalbhor