हरवलेले वृंदावन

उज्ज्वला काळभोर
Saturday, 4 January 2020

तुळस ही स्त्रियांची मैत्रीणच जणू. तिच्यापाशी सारी स्वप्ने, सुख-दुःख त्या व्यक्त करतात आणि आशीर्वाद मागतात.

तुळस ही स्त्रियांची मैत्रीणच जणू. तिच्यापाशी सारी स्वप्ने, सुख-दुःख त्या व्यक्त करतात आणि आशीर्वाद मागतात.

‘‘घराची कळा अंगण सांगते’’, असे पूर्वी म्हटले जायचे. जिथे मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी अंगणच उरले नाही, तिथे तुळशीवृंदावनाला जागा कशी मिळणार? अजूनही बालपणीचे तुळशीवृंदावन मला आठवते. घर बांधताना स्त्रिया तुळशीवृंदावन आपल्या मनाप्रमाणे बांधून घेत. मुलांचा बालपणीचा कितीतरी काळ या तुळशीभोवतीच जात असे. रात्री झोपेत वाईट स्वप्न पडले तर आजी म्हणायची, ‘‘जा, तुळशीच्या कानात सांग म्हणजे मग तुझे वाईट स्वप्न खोटे होईल.’’ घरातील सर्व स्त्रियांनी, मुलींनी नियमितपणे तुळशीला पाणी घालणे, हळदी-कुंकू वाहून प्रदक्षिणा घालणे, रांगोळी काढणे हा नित्यनेमच असायचा. सायंकाळी तुळशीला दिवा लागायचा. मुलींचे लग्न जर जुळत नसेल तर भल्या पहाटे तुळशीवृंदावनाजवळ बसून ‘रुक्मिणी स्वयंवर’ हे पुस्तक वाचायला सांगितले जायचे.

तुळशीपाशी बसून आजी आपल्या नातवंडांना गोष्टी सांगायची. कोणीही आले तरी विसावण्याची पहिली जागा म्हणजे ते तुळशीवृंदावनच असायचे. हिवाळ्यात कोवळे ऊन अंगावर घेण्यासाठी हक्काची जागाही तीच असायची. सासुरवाशिणींची गप्पा मारण्याची जागा म्हणजे हे तुळशीवृंदावनच असायचे. सणावारांना घरोघरी कासार बांगड्या भरायला यायचा. त्याचीही बांगड्या भरायला बसायची जागा तीच असायची. आधी तुळशीच्या लहान-लहान हिरव्या बांगड्या घेतल्या जायच्या आणि मगच घरातील इतर स्त्रिया बांगड्या भरायच्या. नवीन साडी नेसण्यापूर्वी ती घडी उलगडून तुळशीवर टाकली जायची व मगच नेसली जायची. एकंदरीत घरातील सर्व स्त्रियांकडून आधी सर्व मान तुळशीला दिला जायचा. तुळशीचे लग्न लावल्याशिवाय घरातील मुलींच्या लग्नाची बोलणीही व्हायची नाही. तुळस स्त्रियांची एक प्रकारे मैत्रीणच व्हायची. आज तुळशीच्या पूजेमागील वैज्ञानिक कारणे जरी माहिती असली व तुळशीचे औषधी उपयोग जरी ज्ञात असले तरी तुळस व स्त्री यांचे भावनिक नाते मात्र कायम आहे. शहरांमध्ये वृंदावन जरी हरवले असले तरी तुळस मात्र, दारातील आपले अस्तित्व अजूनही टिकवून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by ujwala kalbhor