सुख म्हणजे...

वैजयंती वा. वर्तक
Saturday, 23 November 2019

आयुष्यात समाधान आणि सुख मानण्यावर अवलंबून असते. सुखी राहणे आपल्याच हातात आहे.

आयुष्यात समाधान आणि सुख मानण्यावर अवलंबून असते. सुखी राहणे आपल्याच हातात आहे.

प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात. सुख म्हणजे ज्यामुळे मनाला आनंद, समाधान मिळते ते! माझे सुख माझ्या गच्चीतल्या बागेत आहे.
सकाळी गच्चीचे दार उघडून जेव्हा मी बागेत जाते, तेव्हा निसर्गाने जणू अत्तराची कुपीच उघडलेली असते. सोनचाफा, मोगरा, जाईजुई, निशिगंधाच्या सुगंधाने वातावरण दरवळत असते. जास्वंद, गुलाब, शेवंती, अबोलीच्या नानाविध रंगछटांनी मन अगदी मोहून जातं. माझी झाडे पानांच्या टाळ्या वाजवून माझं स्वागत करतात. याहून मोठे स्वागत जगात कोणते असेल का? निसर्गाशी माणूस कधीच बरोबरी करू शकणार नाही, याची जाणीव सतत होत राहते.

झाडांना पाणी घालताना भारद्वाज दर्शन देऊन जातो. दयाळ येऊन गाऊन जातो. गच्चीवरून गेलेल्या वायरवर कधी पारव्यांची, कधी पोपटांची तर कधी कावळ्यांची शाळा भरलेली असते. कोकीळ निसर्गराजाची कौतुकगीतं ऐकवत असतो. भरून ठेवलेले पाणी प्यायला बुलबुल, शिंपी, पारवे बिचकत, सावधपणे इकडे-तिकडे बघत येतात, हळूच पाणी पिऊन उडून जातात. सूर्य उगवला की शिंजिर, ठिपकेवाल्या मुनिया जास्वंदीवर बागडू लागतात. शिपाई बुलबुल, शिंपी काड्याकाड्या जमवून चाफ्यावर घरटी करतात.

निसर्गासारखा उदार दाता तोच! मग आपण का कंजुषी करायची? अळू, कढीपत्ता, तुळस, लिंबे, चाफ्याची फुलं सर्वांना देताना अपार आनंद मिळतो. खरा दाता तर निसर्गच असतो. बागेत वेळ कसा निघून जातो, समजतच नाही. बागेतलं सारं काम आवरून खाली जाते, तेव्हा मन नकळत दुसऱ्या दिवशीच्या सकाळची वाट पाहायला लागलेले असते. माझ्या दिवसभराच्या ऊर्जेचा स्रोत सकाळच्या बागकामाच्या तासात दडलेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vaijanti vartak