देहदान

वैशाली किशोर पवार
Wednesday, 15 January 2020

बाबा गेल्याचे दुःख एकीकडे होते; तर दुसरीकडे त्यांची देहदानाची इच्छा पूर्ण करायची होती.

बाबा गेल्याचे दुःख एकीकडे होते; तर दुसरीकडे त्यांची देहदानाची इच्छा पूर्ण करायची होती.

नववर्षाच्या स्वागतास जगभर उधाण आलेले असताना, आमच्या घरावर शोककळा पसरली होती. माझे वडील पांडुरंग वाईकर गेले बारा दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंजत होते. मेंदूत रक्तस्राव झाला होता. गेले तीन दिवस प्रतिसाद हळूहळू कमी पडत चाललेला. बाबा गेले. एकीकडे बाबांच्या निधनाचे दुःख होते; पण त्याच वेळी त्यांची इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली होती. त्यांनी मरणोत्तर देहदानाच्या इच्छापूर्तीची जबाबदारी मुलगी म्हणून माझ्यावर टाकली होती. अशा कठीण परिस्थितीमध्ये आईच्या संमतीने सर्व नातलगांशी बोलून मला हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा होता. ‘दादांची इच्छा’ महत्त्वाची या गोष्टीला प्राधान्य देत सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आता मला पुढील सोपस्कारांची लढाई लढायची होती. डॉक्टरांच्या सहकार्याने ‘सिम्बॉयोसिस मेडिकल कॉलेज फॉर गर्ल्स’च्या डॉ. वैशाली भारंबे यांच्याशी मी संपर्क साधला. त्याही परिस्थितीत डॉ. वैशाली यांनी माझे प्रथम सांत्वन केले व देहदानासाठी आवश्‍यक त्या कागदपत्रांची माहिती दिली. मृत्यूचे प्रमाणपत्र व दाखला चुलत भाऊ प्रसाद व सख्खा भाऊ राजेश यांनी मिळवला. तोवर संध्याकाळचे सहा वाजले होते. शोकाकुल सर्वांनी बाबांचा निरोप घेतला. आता मात्र माझ्या दुःखाचा बांध फुटला.

लवळे येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या दिशेने शववाहिका धावू लागली. शववाहिकेत मी बाबांसोबत होते. बाबांच्या समोर बसलेले असताना त्यांच्या कष्टमय जीवनाचा प्रवास डोळ्यांसमोर धावू लागला. नारायणगाव (गुंजाळवाडी, वायकरमळा) येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले बाबा जात्याच अत्यंत हुशार. त्या काळात बोर्डात आले होते. नंतर शिक्षणासाठी पुण्यात आले. पण हलाखीमुळे शिक्षण अर्धवट राहिले. फुगेवाडीच्या ‘सॅन्डविक एशिया’ या कंपनीमध्ये ते साधे कामगार म्हणून नोकरीला लागले. बत्तीस वर्षांच्या कालखंडात हुशारी, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर मेटालर्जिस्ट पदापर्यंत पोचले. कर्मकांडाला कधीही महत्त्व न देता, कर्तव्य पार पाडत राहिले. सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून सर्वांना आयुष्यभर मदत केली. सामाजिक ऋणाचे भान ठेवून बाबांनी शेवटी देहदानासारख्या सर्वश्रेष्ठ दानाची इच्छा व्यक्त केली. टेबलवरचा बाबांचा चेहरा अतिशय शांत, आनंदी व देहदानाच्या इच्छापूर्तीने समाधानाने तरळून गेलेला दिसला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vaishali pawar