उशिराचे शहाणपण

वसंत अभ्यंकर
Thursday, 12 December 2019

मान खाली घालावी लागणे वाईटच; पण खाली मुंडीने चालले नाही, तर कधीही पडून जायबंदी होण्याची भीती, हे शहाणपण थोडे उशिराच आले.

मान खाली घालावी लागणे वाईटच; पण खाली मुंडीने चालले नाही, तर कधीही पडून जायबंदी होण्याची भीती, हे शहाणपण थोडे उशिराच आले.

वय ७९. हल्ली वाचताना डोळ्यांतून पाणी येई, अक्षरे अस्पष्ट दिसत. मोतीबिंदू की नंबर वाढला? नेत्र चिकित्सालयात गेलो. तपासणीनंतर हातात नंबरचे कार्ड देताना डॉक्‍टर म्हणाले, ‘मोतीबिंदू नाही.’ त्यांचे शब्द ऐकले अन् डोळ्यांवरचा व डोक्‍यावरचा ताण गेला! मग लगेच परिचित दुकानासमोर आलो. दुकान अजून उघडले नव्हते. शेजारीच चहाचे नवीन दुकान. तिकडे गेलो. परतताना पाय घसरला. तोंडावर पडलो. डाव्या बाजूला कपाळ, डोळ्याखालचे खोबणीचे हाड व नाकाखालचा ओठ खरचटल्याने रक्त येत होते. बघता-बघता सूज आली होती. डोळ्याखाली सुजेचे टेंगूळ. पुन्हा हॉटेल गाठून चेहरा धुतला. रस्ता ओलांडून औषधाच्या दुकानात गेलो. त्याने दिलेले अँटिबायोटिक्स मलम त्याच्याच देखरेखीखाली लावले. तडक रिक्षाने (अर्ध्या तोंडावर रुमाल) डॉक्‍टरांकडे आलो. माझ्याकडे पाहताच ते दचकले. मग नेहमीप्रमाणे संपूर्ण तपासणी करून, औषधे लिहून देत, बाकी सूचना देत म्हणाले, ‘‘नशिबाने वाचलात, पण तुमच्या ॲक्टिव्हिटी चालू ठेवा.’’ घरी आलो. ‘ट्रिपला जायचे आहे, आता तडतड कमी करा,’ म्हणत हिने गार पाण्याने भिजवलेली घडी दिली. ‘बाबा, नक्कीच धावत बस पकडताना किंवा उतरताना पडलेत’, अशी मुलाची खात्री होती. संध्याकाळी नेहमीच्या अड्ड्यावर गेलो. ‘आता बसने फिरू नका,’ असा सदुपदेश काही मित्रांनी केला. एका चतुर मित्राने ‘या वयात पाय घसरणे योग्य नाही’ अशी हिंस्र मल्लिनाथी केली. मीही उत्तरलो, ‘‘मी यापुढे तुमच्याप्रमाणे मान खाली घालून चालणार, अगदी खाली मुंडी पाताळ धुंडी या न्यायाने.’’

आणि खरेच मी मान खाली घालून चालू लागलो तर मला पदोपदी उखडलेले पेव्हर ब्लॉक्‍स, ब्लॉक्‍सच गायब झाल्याने कचयुक्त खळगे, झाडांच्या मुळांमुळे खालीवर झालेले पदपथ, कुठे नुसतीच पसरलेली कच व राबीट दृष्टीस पडू लागले. हे तुडवताना रस्ता बरा असे वाटून चालावे, तर तिथे जागोजागी सिमेंट निघून गेल्याने उघडे पडलेले मोठे खड्डेच खड्डे दिसतात. त्याचबरोबर रस्ता पातळीशी फटकून तिरपी झालेली मेनहोलची झाकणे दिसतात. मनात आले, इतक्या दिवसांत जागोजागी मी पडलो कसा नाही?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vasant abhyankar