हवेसे व्हॉट्सॲप!

वासंती सिधये
बुधवार, 29 जानेवारी 2020

नवीन माध्यमे उपयोगाचीच आहेत. आपण त्याचा वापर कसा करतो, यावर त्यांची उपयोगिता किंवा निरुपयोगिता अवलंबून असते.

नवीन माध्यमे उपयोगाचीच आहेत. आपण त्याचा वापर कसा करतो, यावर त्यांची उपयोगिता किंवा निरुपयोगिता अवलंबून असते.

‘‘आजी सारखी काय ग व्हॉट्सॲपवर असतेस?’’ असे नातवंडे आजीला विचारणार आणि आजी नातवंडांना सांगणार की, ‘सतत मोबाइलवर गेम्स खेळू नका, फेसबुक वापरू नका.’ एकंदर काय, घरात प्रत्येक जण दुसऱ्याला मोबाइलबद्दल सल्ला देणार. मोबाइलमुळे ज्येष्ठांचीही सोय झाली आहे, हे नक्की. जुने वर्ग मित्र-मैत्रिणी यांची भेट आणि एकमेकांना निरोप सांगणे मोबाइलने सोपे केले. कुठून कुठून कोणी कोणी पुढे ढकललेले संदेश काढून टाकण्यात वेळही जाऊ लागला. जगातल्या खऱ्याखोट्या नवीन गोष्टी सहज कळू लागल्या. व्हॉट्सॲपवर संदेश टाकल्यामुळे हरवलेली व्यक्ती, हरवलेली कागदपत्रे पुन्हा सापडल्याच्या बातम्याही आपण वाचत असतो.

आमच्या कमलिनी मंडळातला किस्सा ऐका. प्रत्येक महिन्याला तिसऱ्या बुधवारी आमचे मंडळ प्रभात रस्त्यावरच्या पंधराव्या गल्लीत ‘नर्मदा’ बंगल्यात असते. अगदी वर्षापूर्वीपर्यंत कार्यकारिणीच्या सदस्य कार्यक्रमाची माहिती पोस्टकार्डावर कळवीत. आता व्हॉट्सॲप समूहामुळे बहुतेकींची सोय झाली आहे, पत्रलेखनाचे काम कमी झाले आहे. नुकताच तिळगूळ समारंभ आणि कविता टिकेकरांच्या गायनाचा उत्कृष्ट कार्यक्रम झाला. गप्पा मारत बाहेर आलो, तर एकीचे शूज बदलले गेले होते. ती नेमकी त्याच दिवशी नवीन सदस्य झाली होती. मी सुनंदाताईंना म्हणाले, ‘‘छायाचित्र काढून व्हॉट्सॲपवर आपल्या समूहात टाका. सुनंदा पालकर कार्यकारिणीत आहेत.

सुनंदाताईंनी लगेचच छायाचित्र काढून समूहावर टाकले. सोबत भ्रमणध्वनीचा क्रमांकही दिला. दुसऱ्याच दिवशी शूजचा शोध लागला. आमच्या समूहाचा एक नियम आहे, महत्त्वाचे निरोप तेवढेच या समूहावर टाकायचे. कुणीतरी पाठवलेले संदेश येथे टाकून इतरांना त्रास द्यायचा नाही. निरोप तेवढेच येत असल्याने सगळ्याजणी सतत समूहातील नोंदी वाचत असतात. त्याचा उपयोग होतो. या नव्या माध्यमांना बोल लावण्यापेक्षा आपणच तारतम्य बाळगून वापर केला, तर ती आपल्या फायद्याचीच ठरतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vasanti sidhaye