आईचा पाठिंबा!

वीणा पाटणकर
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पतीचे निधन झालेले आणि एकुलता एक मुलगा एनडीएमध्ये जाऊ इच्छितोय, काय करावे..? पण, तिने त्याला खंबीरपणे साथ दिली.

पतीचे निधन झालेले आणि एकुलता एक मुलगा एनडीएमध्ये जाऊ इच्छितोय, काय करावे..? पण, तिने त्याला खंबीरपणे साथ दिली.

नुकताच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)मध्ये पदवीदान समारंभ अगदी जवळून बघण्याचा योग आला, तो माझ्या भाच्यामुळे. अनिकेत अमरेंद्र साठे याच्यामुळे. अतिशय शिस्तबद्ध आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा असाच तो सोहळा होता. त्या पासिंग आऊट परेडमध्ये अनिकेतला बघताना माझ्या एका डोळ्यात हासू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू होते. खरेच कधी-कधी रक्ताच्या सख्ख्या नात्यापेक्षा मानलेल्या नात्यांचा ऋणानुबंध फार जीव लावतो. अनुजा ही माझी अशीच मानलेली जीवाभावाची बहीण. वयाने माझ्यापेक्षा लहान. खूपच समजूतदार, गुणी आणि हसतमुख. अनुजा ही अनिकेतची आई आणि आता बाबासुद्धा. बॅडमिंटन या खेळामुळे आम्ही दोघी एकत्र येऊन कधी ‘बहिणी’ झालो हे समजलेच नाही. सगळे काही आनंदात चालले असतानाच, तो भयंकर दिवस उजाडला. सोन्यासारखा चाललेला अनुजाचा संसार क्षणार्धात विस्कटला तो तिच्या यजमानांच्या निधनाने. लहान वयात अकस्मात आलेल्या संकटाने अनुजा पुरती कोलमडली. पण, तरीही अत्यंत खंबीरपणे आणि धीराने आपल्या एकुलत्या एक जिद्दी आणि धाडसी अनिकेतला एनडीएमध्ये जाण्यासाठी परवानगी दिली. स्थिरस्थावर असलेला घरचा व्यवसाय न करता अनिकेतने सैन्यात जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले. मनावर दगड ठेवूनच त्या माउलीने अनिकेतला एनडीएत जायला परवानगी दिली. दोघांच्याही दृष्टीने हे खरेच अवघड होते.

एनडीएमधील तीन वर्षांच्या कठोर परिश्रमामध्ये अनिकेतला काही संकटांना सामोरे जावे लागले. क्रॉस कंट्रीचे आव्हान पेलताना पायाला जबरदस्त दुखापत झाली; तर घोड्यावरून पडल्याने दोन्ही हात फ्रॅक्‍चर झाले. तरीही त्यावर मात करत तो क्रॉस कंट्रीचा कप्तान झाला. ...आणि तो सोनियाचा दिवस अखेर उगवला. अनेक बक्षिसे जिंकून त्याने एनडीएमध्ये उत्तुंग शिखर गाठले. अनुजा आणि अनिकेत या दोघांचाही यशामध्ये समसमान वाटा आहे.

समारंभातील टाळ्यांच्या कडकडाटांनी मी भानावर आले. माझ्या मनात गेल्या काही वर्षांचा अनुजाच्या घर-संसाराचा चित्रपट चालला होता. मनात आले, आई किती खंबीरपणे उभी राहू शकते आपल्या मुलाच्या स्वप्नांमागे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by veena patankar