कृष्ण-श्‍वेत

विजया ओगले
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

काळा आणि पांढरा दोन्ही विरक्तीचे रंग. तरी त्यातला एक चांगला ठरवताना दुसऱ्याला वाईट का ठरवतात? बरे, ते रंगांना चिकटवलेले चांगलेपण किंवा वाईटपण सर्वत्र कायम का ठेवत नाहीत?

काळा आणि पांढरा दोन्ही विरक्तीचे रंग. तरी त्यातला एक चांगला ठरवताना दुसऱ्याला वाईट का ठरवतात? बरे, ते रंगांना चिकटवलेले चांगलेपण किंवा वाईटपण सर्वत्र कायम का ठेवत नाहीत?

‘काय करायचे बाई? पांढऱ्याचे काळे करायची वेळ आली तरी हौस काही कमी होत नाही, ज्यात त्यात नाक खुपसायची!’ हे बोल माझ्या कानी पडले अन् मी चमकले. हा ‘पांढऱ्याचे काळे’ करण्याचा काय फंडा असावा? पूर्वी ‘काळ्याचे पांढरे होणे’ हा वाक्‍प्रचार ऐकला होता. काळे केस म्हणजे तारुण्याचे प्रतीक, तर पांढरे केस म्हणजे वृद्धत्वाची ध्वजा. आता काळ्यापासून पांढऱ्याकडे हा प्रवास वयाबरोबर होतो. त्यामुळे तर आपल्याकडे ‘पांढऱ्या केसांचा मान’ ठेवतात. पण, कधीतरी बालपणी ऐकावे लागलेले असते, ‘काळ्यावर पांढरे करता आले, म्हणजे आली का सगळी अक्कल?’ आता कदाचित याचा अर्थही कोणाला कळणार नाही. कारण, पूर्वी शिक्षण पाटीवर सुरू होई. ती काळीच असायची. मग त्यावर पेन्सिलने पांढरी अक्षरे काढायची. आता काळ्यावर पांढरे म्हणजे थोडेफार शिक्षण असाच अर्थ असायचा. कधीतरी, ‘उडदामाजी काळे-गोरे’, असायचेच असेही ऐकून घ्यावे लागे.

काळा म्हणजे वाईट आणि पांढरा म्हणजे चांगला असा सरसकट अर्थ असत नाही, बरं का! म्हणजे असं की, घरात नवीन सून येताच काही नकोसा प्रसंग घडला तर लगेच तिच्या ‘पांढऱ्या पायाची’ कुजबूज केली जाते. एखादे सासर इतके कजाग असते, की लगेच तिला ‘तोंड काळे कर’ असे बजावते. बाई. बाई.. बाई..! त्याच वेळी कुणीतरी कुणाच्या तरी ‘तोंडाला काळे फासले’ असे कळते. आता कुठेही फिरताना कुत्रा हमखास दिसतोच. काळा, पांढरा, तांबडा, ठिपक्यांचा. पण, काळ्या कुत्र्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे मी एखाद्या ठिकाणी जायचे ठरवले आणि त्याला नकार द्यायचा झाला की आई म्हणायची, ‘‘जाच, काळं कुत्रंसुद्धा विचारणार नाही मग कळेल.’’ आपली काळ्या कुत्र्याने का विचारपूस करावी, ते तेव्हा कळत नसे. पुढे एकदा मी उत्साहाने एका ठिकाणी पोचले आणि पाहते तर काय ‘तिथे काळं कुत्रंसुद्धा नव्हतं’. आता इतके काळ्याला नाक मुरडणारे केस मात्र ‘काळे’च ठेवण्याचा अट्टहास का करतात, न कळे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vijaya ogale