नातवाचा शाळाप्रवेश

विनायक गंधे
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

पाल्याला अमूकच शाळेत प्रवेश हवा, असा अट्टहास धरताना आपण त्या लहानशा मुलाचा विचारच करीत नाही. आपल्याला हव्या त्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी वशिला शोधतो.

पाल्याला अमूकच शाळेत प्रवेश हवा, असा अट्टहास धरताना आपण त्या लहानशा मुलाचा विचारच करीत नाही. आपल्याला हव्या त्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी वशिला शोधतो.

अचानक सकाळी सात वाजता तिचे दूरचे काका-काकू आले होते. त्यांच्या नातवाच्या शाळाप्रवेशासाठी ते आले होते. खात्यातील ओळखीच्या लोकांना सांगून प्रवेश मिळवून द्याच, असा त्यांनी आग्रह धरला. वास्तविक अमूक एका शाळेतच प्रवेश हवा हा अट्टहास का? एखाद्या ठरावीक शाळेतील प्रवेश म्हणजे तेथील सर्व विद्यार्थ्यांच्या यशाची खात्री असते का? भारतातही अमूक एका शाळेतील सर्व विद्यार्थी नामांकित डॉक्‍टर-इंजिनिअर झाले आहेत का, हा विचारच कोणी करत नाही. पालकांच्या डोक्‍यात एक फॅड असते म्हणून एकाच शाळेत प्रवेशाचा हेका धरून बसतात आणि त्याच शाळेत प्रवेशासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करत असतात. नुसत्या ऐकीव माहितीऐवजी पालकांनी त्या शाळेतील सोयी-सुविधांची माहिती घ्यायला हवी. त्या शाळेचा शैक्षणिक दर्जा, शिक्षकांची व्यावसायिक पात्रता, अध्यापनाचा अनुभव, दहावी-बारावीचे निकाल, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षांच्या निकालाची टक्केवारी अशी महत्त्वाची माहिती मिळविण्याचा कोण्या पालकांनी प्रयत्न केला आहे का?
दरम्यान, आमच्या त्या नातवाचा पालकांच्या पसंतीच्या शाळेतील पहिल्या यादीत नंबर लागला नाही. मग त्यांनी माझा नाद सोडून दिला. त्यांनी त्यांच्या परिचयाच्या दुसऱ्या गृहस्थांकडून त्याच शाळेत प्रवेशासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. पण तेथे प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर त्या शाळेबद्दलचे त्यांचे मत आमूलाग्र बदलले. सहा महिन्यांपूर्वी बहुधा जगातील सर्वांत चांगल्या असलेल्या शाळेचा दर्जा पार घसरल्याचे ते सर्वांना सांगू लागले. एवढ्याशा चिमरड्याला घरापासून लांबच्या शाळेत पाठवू नये. घराजवळच्या शाळेची निवड करावी. जाणे-येणे सोपे असणे व वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित असणे ही हल्लीची पहिली आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांचा बराच वेळ जाण्या-येण्यात गेला तर तो अभ्यास कुठल्या वेळेत करणार? एव्हाना शाळा सुरू होऊन एक महिना उलटूनही गेला होता. शैक्षणिक दर्जाच्या दृष्टीने तीही शाळा साधारणच होती, तरीही त्यांनी त्या शाळेचे तोंड भरून कौतुक केले. आम्हालाही खूप आनंद झाला. आम्ही सुटलो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article write by vinayak gandhe