पेन्सिलीची रेषा

बीना बुनगे
बुधवार, 1 मे 2019

केवळ उत्तरपत्रिकेतील ती रेषा नव्हती, ती रेषा होती त्या मुलींच्या आत्मविश्‍वासाची, अचूक निर्णयक्षमतेची.

केवळ उत्तरपत्रिकेतील ती रेषा नव्हती, ती रेषा होती त्या मुलींच्या आत्मविश्‍वासाची, अचूक निर्णयक्षमतेची.

शाळेची वार्षिक परीक्षा सुरू होती. नववी व अकरावीच्या विद्यार्थिनी मन लावून पेपर लिहीत होत्या. वर्गात एकदम शांतता होती. पेपर संपायला साधारण दहा-पंधरा मिनिटे बाकी होती. विद्यार्थिनींची उत्तरपत्रिका जवळजवळ लिहून झाली होती. पुन्हा एकदा सगळे प्रश्‍न सोडविले की नाही हे पाहून झाल्यानंतर काही विद्यार्थिनींनी हातात पेन्सिल व पट्टी घेऊन प्रत्येक उत्तरानंतर सोडलेल्या उत्तरपत्रिकेतील रेषेवर पेन्सिलने रेषा मारण्यास सुरवात केली. एकेका प्रश्‍नाच्या उत्तरानंतर त्या पेन्सिलने रेषा देत होत्या. वर्षभर त्या विषयासाठी घेतलेले कष्ट, वहीत लिहिलेली प्रत्येक प्रकरणाची प्रश्‍नोत्तरे, वर्गात बसून शिक्षकांचे ऐकलेले मार्गदर्शन, त्यांनी एकाग्रतेने केलेले अध्ययन या साऱ्याची समाप्ती त्या पेन्सिलने मारलेल्या रेषेमध्ये मला दिसत होती. त्या विषयाच्या अभ्यासातून त्यांनी घेतलेले ज्ञान, त्या ज्ञानाचा व्यवहारात होणारा उपयोग, त्यांनी वर्षभर आत्मसात केलेली कौशल्ये या साऱ्याचा वापर या विद्यार्थिनी त्यांच्या जीवनात करणार होत्या.

त्या पेन्सिलने कुसंस्कार, कुमार्ग, कुकर्म यांच्यावरच जणू रेषा मारली होती. ती रेषा मला सुसंस्काराची, सुमार्गाची आणि सुकर्माची भासली. त्या शिसपेन्सिलच्या रेषेत मला चारित्र्यसंपन्नता दिसली. नम्रता, आदर, सत्यता यांचा साजच जणू त्या रेषेने परिधान केला आहे, असे मला भासले. निर्भीडपणा आणि स्पष्टोक्तेपणाची किनार जणू त्या रेषेभोवती होती.

जीवनातील अडीअडचणी, समस्या, सुख-दुःखाशी सामना करण्याची ताकद त्या शिसपेन्सिलच्या रेषेत होती. सुसंस्कार आणि नागरिकत्वाची धुरा पेलण्याचे सामर्थ्यच त्या प्रत्येक रेषेने प्रत्येक विद्यार्थिनीला जणू बहाल केले होते. जीवनाकडे आणि जगाकडे उघड्या डोळ्याने पाहण्याची दृष्टी त्या रेषेत सामावली होती. भीती, न्यूनगंड, संकुचितपणा यांचा लवलेशही त्या पेन्सिलच्या रेषेत मला दिसला नाही. प्रत्येक उत्तराला परिपूर्णत्व देणारी ती पेन्सिलची रेषा ही साधी रेषा नव्हती तर, ती विद्यार्थिनींच्या उत्तुंग यशाची रेषा होती. आत्मविश्‍वासाची, उत्तुंग यशाची भरारी घेणारी, समयसूचकतेची, प्रसंगावधानतेची, अचूक निर्णयक्षमतेची रेषा मला वाटत होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by beena bunge