हैरान क्‍यूँ?

चंद्रशेखर भिडे
मंगळवार, 30 एप्रिल 2019

जीवन हे जगण्यासाठीच आहे. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. दुसऱ्याच्या आनंदात सामील व्हा.

जीवन हे जगण्यासाठीच आहे. प्रत्येक क्षण आनंदाने जगा. दुसऱ्याच्या आनंदात सामील व्हा.

जीवन हे जगण्यासाठीच आहे. जीवनात सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे सक्रिय वय संवर्धन. यासाठी माणसाला मेंदू सक्रिय ठेवण्याची गरज असते. जो प्रत्येक श्वास जगतो तो कधीच दु:खी होत नाही. आपल्याला आयुष्याबद्दल एक प्रकारची भीती मनात असते. त्यातून कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय धडधाकट व निरोगी आयुष्य असणाऱ्या व्यक्तीही शारीरिक व मानसिक तक्रारी करू लागतात. या रिकामपणाचे योग्य नियोजन केल्यास हा प्रश्र नक्कीच सुटू शकतो. आपल्याला अनेक समस्या असतात. बदलाची मानसिकता नसते, आर्थिक चणचण, गंभीर आजार, शारीरिक क्षमतेचा ऱ्हास, असुरक्षितता, भीती, चिडचिड. त्यात मरणाची भीती पाठशिवणीचा खेळ खेळत असते. अशा परिस्थितीत जगायला मिळणाऱ्या प्रत्येक क्षणावर प्रेम करायचे असते. त्याचा आनंद मनमुराद घ्यायचा असतो. कितीतरी असे क्षण आयुष्यात येतात ज्या वेळी आपल्याला मन मोकळे करायचे असते. मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशाच्या तशा मांडायच्या असतात. पण, त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाहीत किंवा भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्तीच सापडत नाही.

अशीच अनेक दु:ख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो. मग जगाचा निरोप घेताना, आयुष्यभर ठसठसत असलेली, पण सांगता न येणारी असंख्य दु:ख आपल्याबरोबर असतात. संवेदना जाग्या असल्या, की वेदनांना मोकळे रानच मिळते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरून पुढे जाताना एकच प्रश्र पडतो तो म्हणजे, काही राहिले तर नाही ना मागे? एकदा तरी मागे वळून पाहाच. जुन्या कडू-गोड आठवणी, जुने किस्से ताजे करा. मग बघा, मन कसे प्रफुल्लित होईल. वर्तमानातला क्षण जगण्याची नवी उमेद मिळेल. मग कधीही काहीच मागे राहणार नाही. काळ पुढे जात असतो, उरतात त्या फक्त आठवणी. आपल्या आजूबाजूला अनेक माणसे नेहमी इतरांसाठी जगत असतात. ती माणसेच खऱ्या अर्थाने जगतात. दुसऱ्याच्या आनंदाने आनंदी होण्यासाठी फार मोठे मन लागते. आयुष्याच्या संध्याकाळी समुद्रकिनारी वाळूत रेषा मारून आयुष्याचा लेखाजोखा रेखाटताना एक लाट पायाला चाटून जाते आणि सांगते...तुझ से नाराज नही जिंदगी, हैरान क्‍यूँ है?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by chandrashekhar bhide