फूड फॉर थॉट

डॉ. कपिल झिरपे
बुधवार, 3 जुलै 2019

अतिदक्षता विभागातील एका रुग्ण आजीबाईनी नाश्‍त्याबद्दल तक्रार केली आणि काही निवडक रुग्णांना वेगळा आहार देण्याची कल्पना सुचली.

अतिदक्षता विभागातील एका रुग्ण आजीबाईनी नाश्‍त्याबद्दल तक्रार केली आणि काही निवडक रुग्णांना वेगळा आहार देण्याची कल्पना सुचली.

नेहमीप्रमाणे अतिदक्षता विभागात सकाळचा राउंड घेत होतो. एका आजींची कुरबूर सुरू होती. आज त्या एकदम ताज्यातवान्या, उत्साही दिसत होत्या. मी विचारले, ""काय आजी, काय झाले?'' माझ्याबरोबरची नर्स पुटपुटली, ""सर, आजींना नाश्‍ता आवडलेला नाही.'' मी नाश्‍त्याच्या प्लेटकडे नजर टाकली. नाश्‍त्याच्या दर्जा, स्वच्छता, पदार्थ या दृष्टीने रुग्णासाठी योग्य असाच तो नाश्‍ता होता. मात्र, रुग्णाच्या नजरेतून पाहिले तर मात्र तो नक्कीच परिपूर्ण नव्हता. मी आजींना उत्सुकतेने विचारले, ""आजी, तुम्हाला काय खावेसे वाटतेय?'' छानसे हास्य चेहऱ्यावर आणत आजी उत्तरल्या, ""अंडा आम्लेट, मॅगी, चीज चिली टोस्ट किंवा बोंबिल!'' म्हणजे, आपल्याला काय हवंय हे त्यांच्या मनात पक्के होते. मी त्यांच्या प्लेटमधील नाश्‍त्याची चव घेतली. उपमा जरा अळणी होता. खिरीमध्येही साखरेचे प्रमाण कमी होते. वाटले, की रुग्णाच्या बाजूने विचार करायला हवा. वेदनेने त्रासलेल्या, औषधांनी तोंडाची चव गेलेल्या, बेडवर काहीशा अवघडलेल्या अवस्थेत असणाऱ्या या रुग्णांना ते केवळ अतिदक्षता विभागात आहोत म्हणून ठरावीक पद्धतीचाच शास्त्रशुद्ध आहार द्यायला हवा का? रुग्णांना काही आहार निवडीचे स्वातंत्र्य देता येईल का?
दुसऱ्या दिवशी आमच्या आहारतज्ज्ञ, माझे सहकारी डॉक्‍टर्स आणि मुख्य नर्स यांची मी बैठक घेतली. आम्ही सर्वांनी मिळून ठरवले, की अतिदक्षता विभागामधील निवडक रुग्णांना (विशेषतः जे अधिक काळ वास्तव्यास आहेत) आपण अधिक स्वादिष्ट आहार देऊया. या प्रक्रियेत, रुग्णांना निवड करता येतील अशी पदार्थांची यादीही असेल. स्टाफमधील एका जबाबदार सहकाऱ्याने दररोज पदार्थांची चव घेऊन पाहायला हवी. आहारतज्ज्ञाने संबंधित डॉक्‍टरांची परवानगी घेऊन निवडक रुग्णांसाठी चॉकलेट्‌स, तसेच जरा मसालेदार पदार्थांचाही अंतर्भाव आपल्या प्लॅनमध्ये करायला हवा. अशा या छोट्या गोष्टी रुग्णांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करतात. काही ठरावीक रुग्णांमध्ये डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घेतलेला घरगुती आहार चांगले बदल आणू शकतो. अतिदक्षता विभागात काम करताना येणारा प्रत्येक अनुभव काही शिकण्याची संधी देतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by dr kapil zirpe