दोन जिवलग

गिरीश जाधव
शनिवार, 27 एप्रिल 2019

ते दोघे श्रेष्ठ अभिनेते होतेच; पण त्याहून अधिक संवेदनशील मन असलेले माणूस होते.

ते दोघे श्रेष्ठ अभिनेते होतेच; पण त्याहून अधिक संवेदनशील मन असलेले माणूस होते.

निळू फुले व राम नगरकर हे दोघे जिवलग मित्र होते. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात त्या दोघांची ओळख झाली. पुढे त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीमध्ये झाले. 1970 च्या दशकात "हाऱ्या नाऱ्या झिंदाबाद' या कृष्णधवल चित्रपटातून या दोघांची जोडी रसिकांसमोर आली. पुढे अनेक चित्रपटांत या दोघा मित्रांनी एकत्र भूमिका केल्या. त्यात त्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे "बिनकामाचा नवरा', "एक गाव बारा भानगडी'. नाट्य क्षेत्रातसुद्धा या दोघा मित्रांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यात "कथा अकलेच्या कांद्याची', "राजकारण गेलं चुलीत' व "सूर्यास्त' या नाटकांच्या माध्यमातून या दोघा मित्रांनी रसिक मायबापाचे मन जिंकले.

मी शालेय जीवनात असताना माझी या दोघा मित्रांची ओळख झाली. माझे वडील दलित साहित्यिक मुरलीधर जाधव यांचा निळू फुले व राम नगरकरांबरोबर फारच चांगला दोस्ताना होता. म्हणून अधूनमधून हे दोघे मित्र आमच्या घरी येत असत. तेव्हा मी निळूभाऊ व रामभाऊंबरोबर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत असे. तेव्हा हे दोघे मित्रसुद्धा माझ्या प्रश्‍नांची आवर्जून उत्तरे देत असत. या दोघा मित्रांना कोणत्याच गोष्टीचा गर्व नव्हता. साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी या दोघा मित्रांच्या आयुष्याचे ब्रीद होते. निळू फुलेंनी त्यांच्या आयुष्याची सुरवात ही एफएमसीच्या कॉलेजात माळी कामगार म्हणून केली होती. तर राम नगरकरांचे टिळक रस्त्यावर "वंदन' नावाचे केश कर्तनालय होते. पण हे दोघे मित्र समाजवादी विचारसरणीचे खंदे समर्थक होते. मी दहा दिवस या दोघा मित्रांबरोबर विदर्भात दौऱ्यावर गेलो होतो. विदर्भात निळूभाऊ व रामभाऊंनी नाटकाचे प्रयोग केले. नाटकांतून आलेले सर्व पैसे दोघांनी गडचिरोली येथील आदिवासी दुर्गम भागातील लोकांच्या मुलांच्या संगोपनासाठी सुपूर्त केली. या घटनेनंतर या दोघांबद्दल माझे मन अभिमानाने अजून फुलले. आजसुद्धा माझ्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर आहे. त्या दोघांना गरिबीची जाणीव होती. दोघे मित्र एकापाठोपाठ या जगातून निघून गेले, पण त्यांचे विचार आजसुद्धा जिवंत आहे. मला प्रेरणा देत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by girish jadhav