पॉट आइस्क्रीम

जयंत कोपर्डेकर
शनिवार, 13 एप्रिल 2019

बाजारातील तयार आइस्क्रीमपेक्षा वाड्यातल्या सगळ्या मुलांनी मिळून केलेल्या पॉट आइस्क्रीमची चव लय भारी असायची.

बाजारातील तयार आइस्क्रीमपेक्षा वाड्यातल्या सगळ्या मुलांनी मिळून केलेल्या पॉट आइस्क्रीमची चव लय भारी असायची.

सत्तरच्या दशकात सदाशिव पेठेतल्या एका वाड्यात वीस कुटुंबे आनंदात नांदत होती. दिवसभर सगळ्यांची दारे सताड उघडी असायची. कुणाच्याही घरी जायला परवानगी लागत नसे. सगळे सण, समारंभ, व्रत वैकल्ये, लग्न, मुंज मोठ्या उत्साहात पार पडत असत. आम्हा लहान मुलांचा तर मोठा गट होता. अभ्यास, खेळ, फिरणे, गप्पा सगळे एकत्र होत असे. वार्षिक परीक्षा झाल्यावर तर आम्हा मुलांचा दिवसभर धुडगूस असायचा. फक्त जेवायला, झोपायला काय ते घरी जाणे व्हायचे. पत्ते, कॅरम, गाण्यांच्या भेंड्या, लपाछपी, क्रिकेट, आट्यापाट्या असा भरगच्च कार्यक्रम असायचा. कधी सारसबाग, तर कधी संभाजी पार्क, तर कधी पेशवे उद्यानात आमची छोटी सहल जायची. "फुलराणी'तून मारलेली चक्कर तर अजूनही स्मरणात आहे. बोटिंग करताना पाणी उडवण्याची धमाल काही वेगळीच असायची.

या सगळ्या गदारोळात खरी मजा यायची ती पॉट आइस्क्रीमची. मेहेंदळे काकूंच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम ठरलेला असायचा. सगळ्यांची वर्गणी आधी जमा करायची, मग जवळच्या बेकरीतून लाकडी आइस्क्रीम पॉट भाड्याने आणायचा. बर्फाच्या गाड्यावरून बर्फाची लादी सायकलवरून आणायची. वाण्याच्या दुकानातून खडे मीठ, साखर, व्हॅनिला इसेन्स मागवला जायचा. आधी सांगितल्यामुळे काकूंकडे भय्या दूध देऊन जायचा. मंडईतून भेळीचे सामान आणले जायचे. मग चार वाजता तयारी सुरू व्हायची. आटवलेले दूध पॉटच्या भांड्यात घालून, व्हॅनिला इसेन्स, साखर घालून मग भांड्याच्या कडेला बर्फाचे तुकडे टाकले जायचे. त्यावर मीठ टाकले जायचे. मग ते चाक आळीपाळीने आम्ही मुले फिरवीत असू. सुमारे तासभर ते फिरविल्यावर छान आइस्क्रीम तयार व्हायचे. मग सर्वांना कागदावर भेळ वाटली जायची. भेळीवर ताव मारल्यावर खरी उत्सुकता आइस्क्रीमची असायची. प्रत्येकाने घरून बशी चमचा आणलेला असायचा. काकू सगळ्यांना आइस्क्रीमचे वाटप करायच्या. आम्ही सगळे त्या आइस्क्रीमवर ताव मारायचो. मन आणि पोट तृप्त होईपर्यंत आइस्क्रीम मिळायचे. आताही तयार आइस्क्रीम मिळते. पण त्या पॉट आइस्क्रीमची चव तर लय भारी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by jayant kopardekar