गतीमागे धावे मती!

किशोरी दाभाडे
मंगळवार, 2 जुलै 2019

कुठल्या तरी क्षुल्लक गोष्टीला गती द्यायची. त्यामागे धावायचे. ना त्या गोष्टीचे क्षुल्लकपण ध्यानात घेत, की दमसास लावणारे धावणे कमी करीत नाही. हा आपला खेळच दिसला समोर.

कुठल्या तरी क्षुल्लक गोष्टीला गती द्यायची. त्यामागे धावायचे. ना त्या गोष्टीचे क्षुल्लकपण ध्यानात घेत, की दमसास लावणारे धावणे कमी करीत नाही. हा आपला खेळच दिसला समोर.

घराच्या बागेत एक मांजर व तिच्या दोन पिलांचा वावर सुरू झाला. ती दोन गोजिरवाणी पिले बागेत छान रुळू लागली. आम्ही तिला दूध देत असू. मांजर व तिची गोजिरवाणी पिले यांचे त्यात भागत असे. माझा नातू कबीर याला ती पिले आवडू लागली. तो पिलांबरोबर खेळू लागला. कबीर उठला की त्याची आई त्याला बागेत सोडून तिची कामे करायची. कबीर मांजरीशी खेळायचा. पिलांचा सर्वांनाच लळा लागू लागला. बागेत छोटे चेंडू पडलेले होते. त्या चेंडूंशी खेळायचे, मातीतल्या गोगलगाई मारायच्या, झाडावरचे पक्षी पकडायचा प्रयत्न करायचा, या त्यांच्या हालचाली पाहताना वेळ छान जायचा.

एकदा एक प्लॅस्टिकचा तुकडा पडला होता. पिले तो तुकडा उडवायची, पुन्हा पकडायला धावायची. परत तोच खेळ. मला नेहमी प्रश्‍न पडतोल की पशुपक्षी किंवा मानवेतर सर्व प्राणी वेळ कसा घालवतात? पण त्या मांजरीचे खेळ पाहताना मलाच फार हसू आले. कुठल्या तरी चिटकुराला आधी गती द्यायची, मग ते पकडायला धावायचे, गती थांबली की परत द्यायची. मग त्याच्या मागे धावायचे. कधी पक्ष्यांमागे धावायचे, तर कधी डोलणाऱ्या झाडांबरोबर खेळायचे. जे वर्तमानात समोर येईल त्याबरोबर दोन्ही पिले वेळ घालवत होती. आपणही असाच वेळ घालवतो. काहीतरी फुटकळ गोष्टीला गती द्यायची आणि त्याच्यामागे धावायचे. धावण्याचा वेग एवढा की ज्या गोष्टीमागे आपण ऊर फुटेपर्यंत धावतोय, त्याला गतीपण आपणच दिली आहे, हेच विसरतो. गती देणे थांबवले तर आपली दमछाक होणे आपण थांबवू शकतो हेही विसरतो. ही गती विचारांची जास्त असते. विचार हा मुळातच गतिमान, स्थैर्य नसलेला व चंचल असतो. असा विचार कोणत्याही गोष्टीला जेव्हा गती देतो तेव्हा आपण हताश होतो व सुरवात कोठून झाली तेच विसरतो. आपण गती देतो व त्यात स्वतःच हरवतो. पण मांजरी मात्र त्या कृतीत हरवत नाहीत. त्यांना अचानक काहीतरी नवीन मार्ग सापडलेला दिसतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by kishori dabhade