देवलोकीची वाट

मीलनकुमार परदेशी
शनिवार, 15 जून 2019

हिमालयाच्या पर्वतरांगांमधून, अरण्यामधून फिरताना वेगळाच अनुभव येतो. निसर्गाच्या सन्निध वाटचालही ईश्‍वरी आशीर्वाद वाटतो.

हिमालयाच्या पर्वतरांगांमधून, अरण्यामधून फिरताना वेगळाच अनुभव येतो. निसर्गाच्या सन्निध वाटचालही ईश्‍वरी आशीर्वाद वाटतो.

यंदाही हिमालयाच्या कुशीत जाण्याची ओढ लागली होती. सिलिगुडीमार्गे तिस्ता नदीच्या कडेने युक्‍सुमकडे प्रयाण केले. तेथून ट्रेक सुरू झाला. रथोन्ग नदीच्या सोबतीने बांबू, सिल्व्हर ओकच्या जंगलातून, निरनिराळ्या पक्ष्यांच्या सुरेल संगीतात, डोंगरातून येणाऱ्या धबधब्यावरच्या पुलांना ओलांडत कांचनगंगा नॅशनल पार्कमध्ये प्रवेश केला. चढ-उतार करत चार तासांत साचेनला देवदाराच्या घनदाट वृक्षराजीत लावलेल्या तंबूत मुक्कामी आलो. तोवर जंगली किड्यांनी चावून बेजार केले होते. दुसऱ्या दिवशी शोकाकडे निघालो. चढाई खऱ्या अर्थाने सुरू झाली. देवदार, मॅपल, चेस्टनट, मॅगनोलिया, ओकच्या हिरव्या गर्द जंगलातून वाटचाल करत रेथोन्ग आणि प्रिक नद्यांचा संगम पाहून बखीमला पोचलो. "शोका' मुक्कामी फोनची रेंज संपते. आता इथून पुढे जगाशी संपर्क बंद. शोका ते झोन्गरी सतत चढ, मधूनच लाकडी ओंडके टाकून मजबूत केलेली वाट पार करत फेदांग गाठले. ऱ्होडोड्रेडॉन (बुऱ्हास) वृक्षांच्या वनात शिरलो. या परिसराचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे तेवीस जातींचे ऱ्होडोड्रेडोन येथे आहेत. मागे उत्तराखंडमध्ये याचा सुमधुर रस प्यायला मिळाला होता. छातीवर येणारा मोठा चढ चढून देवरालीला पोचलो.

सूर्योदयाबरोबर कांचनगंगाचे पहिले दर्शन झाले. वेगवेगळ्या पर्वतरांगा, दऱ्याखोऱ्या यामध्ये सर्वांत उंच मनोहारी कांचनगंगा शिखर, खाली हिरवे कुरण, हिमालयीन जंगली प्राण्यांचा निवास, अनोखे सौंदर्य आणि जबरी थंडी अनुभवली. लामुनेला पहाटे दोन वाजता गरम ब्लॅक टी सोबत दिवस सुरू. आता सतत चढ. दिशा उजळताना थानसिंग शिखराला एकदम जवळून समीट पॉइंटशी धापा टाकत पोचलो आणि निळसर छटा असलेली शिखरे पाहून धन्य झालो. तोवर तेजोभास्कराच्या सुवर्णप्रकाशात हिमशिखरे न्हाऊन निघाली. चोहीकडे शुभ्र धवल आणि पिवळसर हिमशिखरे. यापुढे जाण्यासाठी बंदी आहे. सिक्कीम सरकारने हिमबिबट्यांच्या संवर्धनासाठी पुढचा प्रदेश राखीव ठेवला आहे.

इतकी वर्षे भटकंती करतो आहे, पण कोकचुरांग ते फेदांग ही नऊ किलोमीटरची वाटचाल म्हणजे परमेश्वराची विशेष कृपाच. त्या सुंदर वाटेचे वर्णन करण्यास खरोखरच प्रतिभावंत हवेत. नितळ, पारदर्शक अमृतजल, अस्पर्शी उंच वृक्ष, त्यावर किमान सहा इंच जाडीचा शेवाळाचा थर, मोठ्या दगडांनाही शेवाळाची शाल, आल्हाददायक हवा, अतिशय छोटे चढ-उतार, ही वाट कधीही संपू नये असा भाव प्रत्येकाच्या मनात. खरोखर देवलोकीची वाट.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by milankumar pardeshi