esakal | सोबत माणसाची
sakal

बोलून बातमी शोधा

muktapeeth

सोबत माणसाची

sakal_logo
By
मृणालिनी भणगे

माणूस समूहप्रिय आहे. तो एकांताच्या बेटावर नाही राहू शकत दीर्घकाळ. माणसांच्या सोबतीने तो राहतो.

खरेदीच्या निमित्ताने लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग येथे बरेच जाणे-येणे होत असे. काही दिवसांनी मात्र गर्दीत जायचा कंटाळा आला. वाहनांचे आवाज, माणसांचे आवाज याची कलकल वाटायला लागली. आता महिनाभर तरी तिकडे फिरकायचे नाही असे ठरवले. थोड्याच दिवसांत शांततेचाही कंटाळा आला. नवरा कार्यालयात, मुलगा महाविद्यालयात गेल्यावर घरात शांतता. अशा वेळी कामवाली सखू बोलत बसली, तरी बरे वाटे. आमच्या ओळखीच्या एक बाई एकट्याच राहात होत्या. काही दिवसांसाठी त्या वृद्धाश्रमात राहायला गेल्या होत्या; पण लवकरच त्या पुन्हा घरी परतल्या. सांगत होत्या, ""अगं, तिकडे माणसांचे बोलणे खूपच कमी. मुलांचे खेळण्याचे, तरुणांचे गप्पांचे आवाज अजिबातच नाहीत. मला करमेना.'' माणसांनी गजबजलेल्या सोसायटीत त्यांना बरे वाटत होते. पूर्वी वाडा पद्धतीमुळे जाता-येता माणसांच्या गप्पा होत. अर्थात काही वेळा नको तितक्‍याही चौकशा होत; पण कायम माणसांचा वावर असे. माणसांच्या आवाजाचीही एक सोबत वाटते.

मला वाटते, एवढ्याकरताच मोबाईलवर माणसे अर्धा-अर्धा तास बोलत असावीत.
माणसे दूर दूर राहायला गेली. जागा कमी, माणसे जास्त हे समीकरण बदलले आणि आता जागा मोठी, माणसे कमी अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आहे. संध्याकाळी तर टीव्हीचे आवाजच बहुधा ऐकू येतात. परंतु, टीव्ही मालिका पाहात असलो तरीही मित्रमैत्रिणी, सगेसोयरे एकत्र येण्यासाठी, भेटण्यासाठी, मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी शाळा-कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणी, ऑफिसमधल्या मित्रमैत्रिणी, सगेसोयरे असे वेगवेगळे ग्रुप बनवले जातात. महिन्या-दोन महिन्यांनी गेट-टुगेदर ठरवले जाते. एकमेकांना भेटणे, गप्पा मारणे, हास्यविनोद करणे, एकमेकांची सुखदुःखे वाटून घेणे याचा आनंद काही वेगळाच. प्रसंगी घरातील कोणाच्या आजारपणातही एकमेकांना मदत केली जाते. एकूण काय या भेटीगाठीमधला, गप्पांमधला आनंद वेगळाच असतो. यामुळे रोजचे व्यवहार कंटाळवाणे न होता, उत्साह येतो. एकंदरीतच अजूनही माणसाला माणसांच्या समूहामध्ये यावे, बोलावे, मन मोकळे करणे हे हवेहवेसे वाटते. माणसाला माणसाची जाग हवीच हे खरे.

loading image