जेवणाची किंमत

नवनाथ लोंढे
बुधवार, 17 एप्रिल 2019

भुकेचे महत्त्व व जेवणाची किंमत कळायलाही वेळ यावी लागते. अशा वेळी चटणीभाकरही मिष्टान्नासारखी वाटते.

भुकेचे महत्त्व व जेवणाची किंमत कळायलाही वेळ यावी लागते. अशा वेळी चटणीभाकरही मिष्टान्नासारखी वाटते.

प्रजासत्ताकदिनी पहाटेच राजगुरुनगरहून वाड्याला गेलो. तेथे ध्वजवंदन झाल्यावर जुन्नरमार्गे ओतुरला पोचलो. तेथील मित्रांशी चर्चा करून सात-आठ जणांसह बदगी बेलापूर गाठले. छोटी बैठकच झाली. मग पुन्हा ओतूर. राजगुरुनगरला घरी पोचेतोवर रात्रीचे आठ वाजले होते. दिवसभरातील पंधरा तासांत सुमारे अडीचशे किलोमीटरचा प्रवास एसटी, जीप, बाइकवरून केला. दिवसभरात फक्त दोन कप दूध व थोडी भेळ खाणे झाले होते. दिवसभर न जेवल्यामुळे आता कडकडून भूक लागली होती. या क्षणी साधी चटणीभाकरसुद्धा मिष्टान्नासारखी गोड व रुचकर लागली असती. पण घरात चक्क आवडती पुरणपोळी तयार होत होती. पोटात न मावणारी भूक आणि एकीकडे पुरणपोळीचा खरपूस वास, भज्यांचा खमंग वास भूक अजून वाढली होती.
शेवटी पत्नीची साद आली आणि आम्ही चौघेही गोळ्यामेळ्याने जेवायला बसलो. सर्व पदार्थ ताटात वाढून होईतोवर अधीरता अजून वाढत गेली. मग दिवसभराच्या उपासापोटी भटकंतीची सांगता पुरणपोळीचा आस्वाद घेत झाली.

एक गोष्ट जाणवली. जेवणाचा खरा आनंद घेण्यासाठी जेवणापूर्वी थोडा व्यायाम किंवा शारीरिक कष्ट केलेच पाहिजे. जेवणापूर्वी थोडा वेळ जेवणाची प्रतीक्षा करण्याची सवय लावून घेतली पाहिजे, म्हणजे जेवणाचे महत्त्व व त्याची किंमत कळते. पुरेशा कष्टांनंतर काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर जे मिळते त्याचा आनंद, त्याचे समाधान काही वेगळेच असते. कुटुंबीयांसमवेत एकत्र जेवणाचा एक आगळावेगळा आनंद असतो. जीवनात खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर काही अनावश्‍यक गोष्टींचा मोह टाळला पाहिजे. कधीतरी, कशाचा तरी त्याग करायलाही शिकले पाहिजे. एखादी गोष्ट मिळविण्यासाठी त्या क्षणाची वाट पाहायला सुद्धा शिकले पाहिजे. आणि निर्भेळ आनंदासाठी शक्‍य असेल तर तशी संधी निर्माण करता आली पाहिजे. आणि महत्त्वाचे या सर्वांसाठी आपण सदैव सकारात्मक दृष्टिकोन बाळगला पाहिजे. हे सर्व करीत असताना शिस्त पाळलीच पाहिजे. असे केले तर नक्कीच जेवण व जीवन सुखी व समृद्ध होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by Navnath Londhe