लंडनमधील मैत्रीण

रजनी पांडव
बुधवार, 24 एप्रिल 2019

परदेशात समवयस्क मैत्रीण भेटली. शब्दाविन संवाद चालायचा बहुतेकदा, तरीही एकलेपण कमी व्हायचे.

परदेशात समवयस्क मैत्रीण भेटली. शब्दाविन संवाद चालायचा बहुतेकदा, तरीही एकलेपण कमी व्हायचे.

लंडनजवळील निसर्गाच्या कुशीत लपलेले उंचावरचे छोटे शहर म्हणजे ब्रेंटवूड. जंगल, अनेक बागा, कौलारू-विटांची बैठी टुमदार घरे असलेल्या या शहरात मुक्कामाला मी आधीही नऊ वेळा होते. मुलाचे घर स्टेशनपासून दोन मिनिटांच्या अंतरावर. तिथेच बसस्टॉपही आहे. मी रोज सकाळी सात वाजता फिरायला जाते. अर्धा तास फिरून आल्यावर बसस्टॉपवर बसायचे आणि तेथील मजा अनुभवयाची. माझ्या वयाच्याच एक मॅडमही फिरायला येत असत. रोजच्या भेटीने आमची छान मैत्री झाली. त्यांची बोलण्याची ढब ब्रिटिशलयीची. मला "वऱ्हाड निघालंय लंडन'लाची आठवण यायची. एकमेकींचे बोलणे फारसे समजत नव्हते. पण, शब्दाविना कळले आम्हा अशी अवस्था असे. बोलणे आमच्या मैत्रीतील अडचण नव्हतीच.

त्यांचे छोटेसे चार खोल्यांचे बैठे घर. खाली किचन, हॉल व आतून छोटा जिना चढून गेले, की वर दोन बेडरूम्स. त्याला लागून टॉयलेट, बाथरूम. त्या व त्यांची कुत्री ल्युसी दोघीच त्या घरात राहत होत्या. घरासमोर हरतऱ्हेच्या फुलांचे ताटवे फुललेले. गुलाब व सफरचंदाने लगडलेले झाड. घराला कंपाउंड वगैरे काही नाही. मीही एकदा त्यांना मुलाच्या घरी घेऊन आले होते. बेसनचा लाडू व बाकरवडी त्यांनी आवडीने चाखली. स्टेशनवर "फ्री मेट्रो' (वृत्तपत्र) मिळतो, ते त्यांनीच मला दाखविले. आम्ही दोघीही रोज तिथून वृत्तपत्र घेत असू.

नुकतीच पुन्हा ब्रेंटवूडला गेले होते. मी नेहमीप्रमाणे तिथे गेल्यावर सकाळी सातला फिरायला जायला निघाले. स्टेशनपर्यंत गेले. पण, दोन दिवसांत "त्या' काही भेटल्या नाहीत. मग त्यांच्या घरापर्यंत जाऊन आले. दाराला कुलूप. मग मी माझ्या सुनेला विचारले तेव्हा सुप्रिया म्हणाली, ""अहो आई, दोन महिन्यांपूर्वीच तुमची मैत्रीण मला भेटली होती. त्यांची ल्युसी गेली व त्या इथे फारच एकट्या पडल्या. म्हणून त्यांची मुलगी आली व त्यांना तिच्याकडे घेऊन गेली. घरही विकले त्यांनी.'' अरे देवा, म्हणजे माझी मैत्रीण मला आता भेटणार नव्हती!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by rajani pandav