राजूमामाचा आधार

रंजना गंधारे
बुधवार, 5 जून 2019

घरातील वादापासून ते आमच्यासह मुलांची लग्नं जमवण्यापर्यंत राजू आम्हा बहिणींसाठी आधारस्तंभ होता. वडिलांच्या जाण्यानंतर तोच खरा आमचा पालक होता.

घरातील वादापासून ते आमच्यासह मुलांची लग्नं जमवण्यापर्यंत राजू आम्हा बहिणींसाठी आधारस्तंभ होता. वडिलांच्या जाण्यानंतर तोच खरा आमचा पालक होता.

माझे माहेर गणेश पेठेत गुरुद्वाराच्या अलीकडील चौकात. जुनेच 60-70 वर्षांपूर्वीचे घर. आम्ही सर्व मिळून 30 जण होतो तेथे. घर अगदी जुन्या वळणाचे असल्यामुळे आम्हाला कधीही सख्खे-चुलत असे वाटले नाही. त्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आईला आम्ही सहा मुली व एकच मुलगा. म्हणजे आमचा भाऊ राजू सर्वांत लहान असल्यामुळे अगदी लाडका. घरचे कपड्याचे दुकान असल्यामुळे आमच्या राजूला शिक्षण व जॉब सोडून दुकान चालवावे लागले व त्याकाळी म्हणजे 1970 मध्ये बरीच दुकाने एकाच ठिकाणी असल्यामुळे आमचे दुकान जवळजवळ बंद पडण्याची वेळ आली. आम्हा चार बहिणींची लग्ने करून दिल्यामुळे कर्जही झाले. अशातच एके दिवशी वडील घराबाहेर पडले ते परत आलेच नाहीत. तरीही आमच्या या भावाने सर्व घर सावरून आम्हालाही मोठा आधार दिला. आम्हा प्रत्येक बहिणीच्या, मुला-मुलींच्या लग्नात तो स्वतःहून लक्ष द्यायचा व लग्नामध्ये प्रत्येकाच्या मागे मामा म्हणून उभा असायचाच. म्हणूनच की काय, त्याच्या सर्व भाचे आणि भाचींचा तो अतिशय आवडता तर होताच.

सर्वांनी कधीही त्याचा शब्द मोडला नाही. घरातील वादापासून ते मुलांची लग्नं जमवण्यापर्यंत तो आम्हा बहिणींसाठी नेहमी पुढे असायचा. स्वतःच्या घरातील अडचणी सोडवून तो आम्हालासुद्धा सर्वतोपरी मदत करायचा व योग्य तोच सल्ला तो आम्हालाही द्यायचा. नंतर भावाच्या मुलाने मोठा फ्लॅट घेतला व सर्व जण तिकडे राहायला गेले. इतक्‍या वाईट परिस्थितीतून चांगले झाल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता. आम्हीही त्याच्या आनंदात सहभागी झालो होतो; पण देवाची खेळी कधी कोणाला समजली आहे का? इतक्‍या वर्षांनंतर आलेला आनंदसुद्धा फार काळ टिकला नाही. एक दिवस आमच्या नातेवाइकांच्या कार्यक्रमास गेला आणि जेवण वगैरे करून घरी आल्यावर पहाटे उलटी होण्याचे निमित्त झाले. त्या वेळी ताबडतोब दवाखान्यात नेले, तर डॉक्‍टरांनी अन्ननलिकेत बिघाड झाल्याने ऑपरेशन करावे लागेल म्हणून सांगितले. ऑपरेशननंतर 8-10 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवूनदेखील त्याने या जगाचा निरोप घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by ranjana gandhare