कौतुकाची थाप...

रवींद्र गांधी
बुधवार, 12 जून 2019

दुसऱ्यांचे कौतुक कराच; पण सध्याच्या काळात मनातील ताणतणाव दूर करायचे असतील, तर स्वतःलाही शाबासकी द्या.

दुसऱ्यांचे कौतुक कराच; पण सध्याच्या काळात मनातील ताणतणाव दूर करायचे असतील, तर स्वतःलाही शाबासकी द्या.

प्रत्येकाला चांगल्या कामाच्या कौतुकाची अपेक्षा असते. एखादी गृहिणी नवीन काही पदार्थ केले, की आपल्या चेहऱ्याकडे पाहत असते. आपण पटकन चांगला अभिप्राय दिला तर ते एक प्रकारे तिच्या मनाला आनंददायक असते; पण आपण चुका काढल्या तर पुढे कोणी नवीन करण्यास धजवत नाही. म्हणून नवोदित, शिकाऊ, उत्साही यांचे कौतुक करायला पाहिजे. कौतुक करायला काही खर्च येत नाही. गायक, खेळाडू, आचारी, लेखक, लहान मुलांनी काही चित्रे काढली तर त्यांची स्तुती करावी. आज सगळीकडे मॉल, दुकाने आहेत; पण तेथून आपणच आपल्या यशासाठी, स्वतःसाठी विकत घेऊ शकत नाही. कष्ट, प्रयत्न, स्पर्धा यातून जे यश मिळते त्यासाठी आपल्याला मिळणारे चषक ही एक कौतुकाची थाप असते. पुरस्कार मिळतो तेव्हा खूप आनंद होतो. पण पुढे पुढे या चषकांनी कपाट भरल्यानंतर ठेवण्यास जागाही राहत नाही. पुढे तर धूळ लागलेली असते. काही व्यक्तींनी पुरस्काराची व्यवस्थित कपाटात मांडणी केलेली असते. त्यावर वेळ, ठिकाण, हेतू याविषयी व्यवस्थित लिहिलेले असते. आपण कशा प्रकारे उत्साह दाखवतो, त्यावर आपले व्यक्तिमत्त्व खुलते आणि वर्तमानात व सकारात्मक राहण्यास मदत करते.

क्रीडा, कला क्षेत्रात "शाब्बास', "ग्रेट', "कीप इट अप', "लढ', "पळ पळ' असे प्रोत्साहन देणारे शब्द ऐकण्यास हमखास मिळतात. काही वेळा हरण्यात जो आनंद आहे तो जिंकण्यात नसतो. कौतुक व टीका या दोन्हींचा स्वीकार करा. कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन व पाऊस या दोन्हींची गरज असते. प्रत्येक कामात चांगले पाहायला हवे. आज स्पर्धेचे युग आहे. तुलनांमुळे ताणतणाव वाढतो आहे, त्यामुळे वाद वाढत आहेत. आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. काही वेळा भीतीने तणाव वाढतो. अशा काळात आपणच आपले कौतुक करावे. म्हणायचे, "माझे सर्व चांगले आहे.' "मी भीत नाही, मी ताण घेत नाही.' स्वतःच स्वतःला शाबासकी द्यायची.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by ravindra gandhi