डबलसीट

शेख निसार अहमद उस्मान
शनिवार, 18 मे 2019

आज भाच्यांच्या गाडीतून फिरतो, पण त्यांच्या वडिलांबरोबर भाड्याच्या सायकलवरून फिरण्यात अधिक आनंद होता.

आज भाच्यांच्या गाडीतून फिरतो, पण त्यांच्या वडिलांबरोबर भाड्याच्या सायकलवरून फिरण्यात अधिक आनंद होता.

अकरावी झाल्यानंतर पुण्यात आलो. माझे मेहुणे एच. वाय. सय्यद पुण्यात पोलिस खात्यात लेखनिक होते. त्यांनी प्रयत्न करून किर्लोस्कर फिल्टर्स कंपनीत नोकरी मिळवून दिली. त्यांच्याकडेच राहून तीन वर्षे या कंपनीत कामगार म्हणून काम केले. पुढे आणीबाणी सुरू झाली. उत्पादनावर नियंत्रण आले. काम कमी झाल्यामुळे कामगार कपात केली गेली. मी अखेरच्या कामगारांमध्ये असल्याने कपातीच्या यादीत माझा समावेश होता. मला कामावरून कमी करण्यात आले. मी पुण्यातून नागपूरला गेलो. तेथे व्यवसाय करू लागलो. पण अचानक फडगेट पोलिस चौकीचे रायटर एच. वाय. सय्यद यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले, अशी बातमी आली. त्यांनीच मला पहिली नोकरी मिळवून दिली होती. आता बहिणीच्या संसाराचे गाडे विसकटले. तिला मदतीची गरज होती. अल्लाने ऐकले. कंपनीतून कमी करून अडीच वर्षे झाली होती. पण कंपनीने नागपूरला संपर्क साधून पंधरा दिवसांच्या "टेंपररी' नोकरीसाठी बोलवून घेतले. बहिणीला आधार व भाच्यांना साथ देण्यासाठी पुण्यात आलो. पंधरा दिवसांच्या नोकरीसाठी रुजू झालो खरा, पण माझ्या कामाने कायम झालो. पुढे पंचवीस वर्षांनी "प्रॉडक्‍शन सुपरवायझर' म्हणून निवृत्त झालो.

मोठा भाचा अब्दुल करीम सय्यद यास शिक्षण देऊन पोलिस कॉन्स्टेबल म्हणून भरती केले. त्याने आपल्या हुशारीने चोरीच्या मोटारी, मोटरसायकली यांच्या तपासात चांगले यश मिळवून खात्यात पारितोषिके, प्रशिस्तपत्रके मिळवली. अन्य दोन भाच्यांनी पुणे व नगरमध्ये फॅब्रिकेशन व्यवसाय उभारला. माझे मेहुण्यांना त्या काळात सायकल घेणेही परवडत नव्हते. आज त्यांच्या नातू-नातीकडेही महागड्या गाड्या आहेत. भाच्यांच्या गाड्यांमधून फिरण्याचा आनंद मिळतो, पण भाड्याच्या सायकलवरून मेहुणे मला नोकरीसाठी डबलसीट फिरवत त्या आठवणी, त्या वेळचा आनंद माझ्यासाठी अजूनही अनमोल आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by shaikh nisar ahmad usman