पारंब्यांचा वड

शुभम दिलीप काकडे
गुरुवार, 18 एप्रिल 2019

जगाचे रहाटगाडगे सुरूच असते. वड उन्हात तापत सावली देतो विनातक्रार. नवी पारंबी वाढत असते नव्या घरट्यांसाठी.

जगाचे रहाटगाडगे सुरूच असते. वड उन्हात तापत सावली देतो विनातक्रार. नवी पारंबी वाढत असते नव्या घरट्यांसाठी.

शिक्षणासाठी परदेशात गेलेला मुलगा परतलाच नाही. कधीतरी महिन्या-दोन महिन्यांनी अचानक फोन वाजतो. फक्त पैसे पाठवा एवढेच सांगायचे असते. एकदा एक जोडपे अचानक घरी आले. त्यांनी मुलाची ओळख सांगितली. घरात घेतले. आमच्या गप्पांना, चौकशीला सुरवात होत असतानाच त्या तरुणाचा मोबाईल वाजला. तो बोलायला लागला, ""सर, मी घर बघितलेय आणि आम्हा दोघांनाही घर आवडले आहे,'' असे म्हणत त्याने फोन मला दिला. पलीकडून मुलगाच बोलत होता. त्याने आमच्याशी आधी काहीच न बोलता परस्पर घर भाड्याने देऊन टाकले होते. माझा मुलगा चाळीत वाढू नये म्हणून मी जिद्दीने हे घर घेतले होते. येथेच मुलगा वाढला आणि आता त्याने घर परस्पर भाड्याने देऊनही टाकले होते.

आम्ही गेल्या तीन वर्षांपासून चाळीत राहात आहोत. आधीच्याच चाळीत परतलो आहोत. तीन वर्षे मजेत गेली आमची चाळीत. रोज उठायचे, आवरायचे आणि चाळीत बाजूला एक वडाचे झाड आहे तिथे जाऊन बसायचे. मित्रमंडळींसोबत गप्पा मारताना वेळ जातो सहज. माझ्या आजोबांनी या वडाच्या झाडाची निगा राखली होती. ते या वडाच्या झाडाच्या पारंब्या जेव्हा जमिनीला टेकत तेव्हा त्याभोवती दगडमाती रचत. आम्ही लहान होतो त्या वेळी, पण कुतूहलाने बघत असू त्यांना हे करताना. त्या दगडमातीचा आधार मिळाला की ती पारंबी आणखी घट्ट जमिनीत उभी व्हायची. मग नवे घरटे व्हायचे त्यावर. आता हे आठवत बसलेलो असताना एक गाडी समोर येऊन उभी राहिली. गाडीतून आवाज आला, ""आजोबा येता का फिरायला? चला, चक्कर मारून येऊ.'' आमचे भाडेकरू त्यांच्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन शाळेत निघाले होते. मी गाडीत बसलो. छान गप्पा झाल्या. म्हणाला, ""सध्या मुलाच्या शिक्षणासाठी पळापळ चालू आहे सगळी. तो एकदाचा शिकला म्हणजे आम्ही मोकळे.'' वाटले, वडाची पारंबी जमिनीला टेकलीय. पारंबीभोवती दगडमातीची रास रचली जातेय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by shubham kakade