निनाद घंटेचे!

स्मिता पतकी
बुधवार, 10 एप्रिल 2019

घंटेचा नाद नादावणारा असतो. घंटांना इतिहास असतो. कधी सावध करणारी, तर कधी सूचक घंटा आपल्याही मनात वाजत असते.

घंटेचा नाद नादावणारा असतो. घंटांना इतिहास असतो. कधी सावध करणारी, तर कधी सूचक घंटा आपल्याही मनात वाजत असते.

अगदी लहानपणापासून रोजच पूजा झाल्यावर देवघरात होणारा घंटानाद मंजुळ वाटतो. पुढे शाळा सुटल्याची घंटा हवीहवीशी असते. सांज-सकाळी गायीगुरांच्या गळ्यांतील घंटेची नादमयता भुलवणारी असते! तर आगीच्या बंबाची घंटा उरात धडकी भरवते. चर्चमध्ये लहान-मोठ्या घंटा काही विशिष्ट वेळाला, प्रसंगांना वा प्रार्थनेला वाजवल्या जातात. कचरा गोळा करणारी घंटागाडी रोज न चुकता यायला हवीच असते. बऱ्याच गावांमध्ये दर तासाला घंटा वाजवून किती वाजले हे सांगायला "घंटाघर' असते. पूर्वी ब्रह्मगिरी येथील घंटा पावसाळ्यात विशिष्ट प्रकारे वाजू लागली की पुराचे पाणी वाढत असल्याची धोक्‍याची सूचना त्र्यंबकेश्‍वरीच्या गावकऱ्यांना मिळत असे. ती आकाराने भव्य, आवाजाने दिव्य अशी "नारोशंकरी' घंटा आजही बघायला मिळते. आपल्याकडे एकेकाच्या आवाजाला देखील घंटेची उपमा दिली जाते. कर्णकर्कश-घणाणून दणाणून टाकणारा आवाज म्हणजे नारोशंकरी घंटा, तर नाजूक स्वर म्हणजे किणकिणणारी घंटा!

अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फिया शहरातील "फ्रीडम बेल' माझ्या बघण्यात आली. "कॅमेलिआ फ्रीडम बेल' नावाची सुंदर लाल रंगाची फुले असतात. पण "लिबर्टी बेल' हे एक अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाशी निगडित वैशिष्ट्यपूर्ण गौरवचिन्ह आहे. ही बेल प्रथम 1752 ला लंडनमध्ये बनवून आणली गेली. फिलाडेल्फियामध्ये ही बेल वाजवून लोकांच्या सभा घेतल्या जात असत. अमेरिका स्वातंत्र्याच्या वेळी ही बेल वाजवली गेली तो दिवस होता 8 जुलै 1776! ही ब्रॉंझची असून, तीन फूट उंच व बारा फूट व्यासाची आहे. कर्नल जॉन निक्‍सनने यादिवशी ही बेल वाजवून फिलाडेल्फियातील नागरिकांसमोर "स्वातंत्र्याचा जाहिरनामा' वाचला होता. सध्या ही बेल "लिबर्टी बेल सेंटर, नॅशनल हिस्टॉरिक पार्क' येथे ठेवली आहे. तिचे वजन, आकारमान, धातू, ऐतिहासिक महत्त्व, घटना असे सविस्तर वर्णन वाचायला मिळते.अशा बर्लिन, कॅमेलिआ, क्राफ्ट, वॉशिंग्टन डी.सी. येथील अजूनही काही "फ्रीडम बेल' जगप्रसिद्ध आहेत. प्रत्येक ठिकाणच्या इतिहासाची पार्श्‍वभूमी वेगळी आहे.

Web Title: muktapeeth article written by smita patki