ओढ मातीची

सुचरिता पोरे
गुरुवार, 6 जून 2019

आपल्या माणसाचं तरी काय वेगळं असतं? अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जोडीला थोडी मायाममता पुरेशी असते. टीटभर बागपण मणभर समाधान देऊ शकते.

आपल्या माणसाचं तरी काय वेगळं असतं? अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जोडीला थोडी मायाममता पुरेशी असते. टीटभर बागपण मणभर समाधान देऊ शकते.

"रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण मातीतूनी आले वरती, मातीचे मम अवघे जीवन' असं कवयित्री इंदिरा संत म्हणतात. माझं लहानपण कृष्णाकाठी ऐसपैस वाड्यात गेलं. टुमदार घर, मागे अंगण आणि त्यामध्ये सदाबहार फुलबाग असं शाही बालपण लाभलं होतं. पुण्यात फ्लॅट संस्कृतीशी जुळवून खिडकीत एक छोटीशी तुळशीची कुंडी मात्र आधुनिक काळ असला तरी मराठमोळ्या संस्कृतीशी नाळ टिकवून होती. एके दिवशी मुलीच्या प्राथमिक शाळेत कंपोस्ट खत करण्याचा आणि झाडाच्या वाढीचा निरीक्षण करण्याचा प्रकल्प सांगितला. ती उत्साहाने कामाला लागली. तुलनात्मक अभ्यासासाठी दोन कुंड्यांमध्ये नर्सरीतून आणून छोटीशी गुलाबाची रोपटी लावली. प्रकाश संश्‍लेषणासाठी उन्हाची तिरीप तरी मिळाली पाहिजे, याचा विचार करून ग्रीलच्या खिडकीत कुंड्या ठेवल्या. प्रयोग थोड्याच दिवसांत पूर्ण झाला. यानिमित्ताने एक नवीन सुरवात झाली. घरातल्या जुन्या बादल्या, प्लॅस्टिकचे डबे कंपोस्टसाठी वापरायला काढले. भाज्या-फळांचा कचरा त्यात भरल्यावर छानसं रोपटं लावणं याचा नादच लागला. मुंबईच्या चाळीत कशी सगळी माणसं गुण्यागोविंदाने राहतात तशी आमच्या दोन्ही ग्रीलच्या खिडक्‍यांमध्ये गुलाब, मोगरा, शेवंती, निशिगंध यांच्या जोडीला तगर, झेंडू, जास्वंद, अबोली छोट्याशा जागेत फुलायला लागली. कुमारमाशी हळूच घर करून गेली. इटुकल्या हिरवाईत चिटुकलं फुलपाखरू भिरभिरलं. उन्हाचे कवडसे सोसावेत म्हणून संक्रांतीच्या छोटुकल्या बोळक्‍यामध्ये पाणी भरून ठेवलं, तर पिटुकली चिमणी आणि छिटुकला बुलबुल पाणी प्यायला येऊ लागला.

शाळेच्या प्रयोगाच्या निमित्ताने आमचा आपला छोटेखानी निसर्ग सजला. प्लॅस्टिक स्माइलच्या आजच्या जगात ही फुलझाडं जुन्या निरागस स्मितहास्याची लकेर चेहऱ्यावर देऊ लागली. आनंददायी रम्य प्रभातीचे सूर रोज छेटू लागले. धकाधकीच्या दिनक्रमासाठी प्रसन्नतेची ऊर्जा लाभू लागली.

निसर्गासारखा सगासोयरा नाही, असं म्हणतात ते किती खरं आहे ना! सकस माती, थोडंसं उन्ह आणि पुरेसं पाणी मिळाली की बी कसं आपसूक तरारून उगवतं. आपल्या माणसाचं तरी काय वेगळं असतं? अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जोडीला थोडी मायाममता पुरेशी असते. टीटभर बागपण मणभर समाधान देवू शकते की! तुकोबांनी म्हणंच आहे की आनंदाचे डोही आनंद तरंग.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by suchrita pore