साबूदाण्याची खिचडी

सुधामती पारखी
शनिवार, 4 मे 2019

वाढते वय होते कातर अन्‌ आपसूक आठवते आईच्या हातची चव.

वाढते वय होते कातर अन्‌ आपसूक आठवते आईच्या हातची चव.

त्या दिवशी रात्रीचे जेवण झाल्यावर मुलाने सांगितले, की उद्या सकाळी लवकर बाहेर जायचे आहे, नाश्‍त्यासाठी साबूदाण्याची छान खिचडी कर. माझे मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून माहेरच्या अंगणात गेले. तिथून स्वयंपाकघरात जाऊन आई कोपऱ्यात ठेवायची तो पाटा-वरवंटा शोधू लागले. मला आठवते, दर शनिवारी आईचा व वडिलांचा उपवास असायचा. आई पाट्यावर हिरवी मिरची, मीठ वाटून त्यावरच भाजलेले शेंगदाणे बारीक करायची. हे सर्व मिश्रण भिजवलेल्या साबूदाण्यावर घालून लोखंडी खोलगट तव्यामध्ये तुपावर परतायची. सर्व घरभर त्या खिचडीचा सुवास यायचा. शनिवारी दुपारीच आमची शाळा सुटायची. घरी आल्याबरोबर मी, माझी बहीण व भाऊ खिचडीवर ताव मारायला बसायतो. आमचे खाऊन झाल्यावर आईला किती उरायची माहिती नाही. त्या वयात तो विचारही मनात आला नाही. या विचाराने आणि आईच्या आठवणीने मन व्याकूळ झाले. डोळ्यांतून गंगायमुना वाहू लागल्या; पण दुसऱ्याच क्षणी आठवले, की माझ्या वडिलांना शनिवारी "हाफ-डे' असायचा. कितीही दमलेले असले तरी ते घरी येतानाच फराळासाठी शेंगदाण्याची गुडदाणी, खजूर व उपवासाचा चिवडा घेऊन यायचे. कधीतरी गडबडीत विसरून घरापर्यंत आलेच आणि कितीही उशीर झालेला असला तरी तसेच परत जाऊन सर्व पदार्थ घेऊनच घरी यायचे. वडील घरी आल्यानंतरच दोघांचा फराळ व्हायचा. दोघांचे एकमेकांवर खूप जिवापाड प्रेम होते. समाधानाची गोष्ट एकच, की आता मिक्‍सर ग्राइंडरच्या जमान्यातसुद्धा माझ्या भावजयीने आईचा पाटा-वरवंटा अजूनही जपून ठेवला आहे. आवश्‍यक तिथे ती त्याचा वापरही करते. हल्ली उपवासाचे कितीतरी पदार्थ बाजारात उपलब्ध असतात, तसेच आपणही कितीतरी वेगवेगळे पदार्थ घरी बनवतो; पण आईच्या हातच्या साबूदाण्याच्या खिचडीची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. या सर्व आठवणी जागवत असताना, आपसूकच माझ्या ओठांवर ओवी आली,
"खाऊ वाढला दुधातुपाचा घावणा
बयाच्या गावाला आत्मा गेला पाव्हणा'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by sudhamati parkhi