सोसायटीचे मामा

सुजाता रानडे
मंगळवार, 7 मे 2019

सोसायटीतील वॉचमन केवळ प्रवेशद्वारावरचा चौकीदार नसतो, तो असतो त्या सोसायटीतील प्रत्येकाचा जवळचा कुणीतरी.

सोसायटीतील वॉचमन केवळ प्रवेशद्वारावरचा चौकीदार नसतो, तो असतो त्या सोसायटीतील प्रत्येकाचा जवळचा कुणीतरी.

अनिलमामा आमच्या सोसायटीचे वॉचमन होते. दिवसभर त्यांची ड्युटी. अपार्टमेंटची झाडलोट किंवा इतरही कामे, सभासदांसाठी दिलेले निरोप, नोटिसा वगैरे करून ते प्रवेशद्वारासमोर असणाऱ्या टेबल खुर्चीशी येऊन बसत. दूधवाले, पेपरवाले, सगळ्यांकडे कामाला येणाऱ्या मावश्‍या या सर्वांची अनिलमामाच आधी दखल घेत असत. एखादी मावशी, त्यांना गडबड असेल तर त्यांच्याशी न बोलता गेली तर म्हणायचे, ""आज काय घरी गोड खाऊन आलात काय? गप्पपणे चाललात!'' मुले पार्किंगमध्ये मोकळ्या जागी खेळत असतील तर त्याकडे त्यांचे लक्ष असायचेच. पण तसेच लक्ष पहिल्या मजल्यावरील "कॅडकॅम'मध्ये शिकायला येणाऱ्या मुलांकडेही असायचे. आम्ही ज्येष्ठ मंडळी रिक्षातून आलो, जवळ सामान असेल, गावाहून कोणीही आलेले असोत, ते सामान घ्यायला येत. विचारणा करत. लिफ्टचे दार उघडून द्यायचे, सामान ठेवायचे. संध्याकाळी मी खाली फेऱ्या घालायला जाताना माझ्यासोबत मावशी असायच्या. पण एखाद्या दिवशी मावशी नसतील तर मी एकटीच खाली यायची. तब्येतीमुळे एकटीला फेऱ्या घालण्याचा विश्‍वास वाटायचा नाही. पण मामा मला पाहून म्हणायचे, ""मारा फेऱ्या, मी आहे.'' त्यांचे शब्द आधार वाटायचे.

मामांच्या मुलीचा दहावीचा निकाल लागला. अपार्टमेंटमध्ये सर्वांकडेच ते मुलगी पास झाल्याचे पेढे द्यायला तिच्याबरोबर आले. तिचे कौतुक मामांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. मामा पार्किंगमध्ये बसलेले असत, तेव्हा त्यांचे गप्पांचे मंडळ असे. या मंडळात गणेशदादा, रिक्षावाले, विठ्ठल टेलर, सहाव्या मजल्यावरच्या ऑफिसमधला मंगेश, कॅडकॅमच्या ऑफिसमधील श्रीकांत अशी गप्पा करणारी मंडळी असायची. पण गप्पा मारत असले तरी अपार्टमेंटमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांवर लक्ष असायचे. त्यांच्या सासऱ्यांचे निधन झाले. धार्मिक विधींसाठी ते चिपळूणला त्यांच्या गावी गेले. मध्ये एखादाच दिवस गेला असेल, सकाळी उजाडताच अमर हा मामांना कधी कधी कामात मदत करणारा मुलगा सांगत आला, ""मामा गेला. छातीत दुखते म्हणून डॉक्‍टरांकडे नेले. पण काही उपयोग नाही झाला.''
बरेच दिवस मामांची खुर्ची रिकामीच दिसायची.

Web Title: muktapeeth article written by sujata ranade