पिंपरणीचे छत्र

सुशीला संकपाळ
गुरुवार, 16 मे 2019

पिंपरणीच्या सावलीत गुरेही विसावायची आणि मुलेही खेळायची. सगळ्यांनाच पिंपरणीचा लळा होता.

पिंपरणीच्या सावलीत गुरेही विसावायची आणि मुलेही खेळायची. सगळ्यांनाच पिंपरणीचा लळा होता.

बारमाही वाहणाऱ्या तीन ओढ्यांनी वेढलेल्या, मळ्यांनी नटलेल्या; कडुलिंब, चिंच, पिंपरणी, वड, पिंपळानी घराघरांवर छत्र धरलेल्या गावात बालपण गेले. माझ्या तीनही मुलांचे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. घराशेजारी मोठी पिंपरणी होती. जमिनीपासून समांतर चौफेर त्याच्या फांद्या विस्तारलेल्या. काही ठिकाणी वर आलेल्या मुळांची बसण्याची बैठक झाली होती. गर्द सावलीत सूर्यकिरणांना शिरकाव नसे. सावलीत एकीकडे वासरे-कोकरे बांधलेली असत. दुसरीकडे टिपऱ्यापाणी, सागरगोटे, गोट्या असे आम्हा मुलांचे खेळ चालत. गप्पागोष्टी करत बायकांची उन्हाळ कामे चालत. श्रावणात झोके झुलत. त्या पिंपरणीला वर्षातून दोन-तीन वेळा तरी फळांचा बहर येत असे. काळी होऊन पक्व झालेली फळे फारच मधुर लागत. मग वर पक्षी आणि खाली मुलांची झुंबड उडत असे. ती फळे खाण्यास पोपटांचे थवे येत असत. भल्या पहाटे पक्ष्यांच्या कोलाहलाने जाग येई.

माझी मुलेही पिंपरणीच्या अंगाखांद्यावर खेळली. सावलीत बागडली. फांद्यांवर झुलली. थोडा मोठा झाल्यानंतर माझ्या दोन क्रमांकाच्या मुलास घराबाहेर पडल्यानंतर आणि बाहेरून घरी येताना उंच उडी मारायची, पिंपरणीची फांदी घट्ट पकडायची आणि झोके घ्यायची सवयच लागली होती. हात सुटून पडशील म्हणून सर्वांचे सांगून, ओरडून झाले. पण त्याची ती सवय काही जाईना. एके दिवशी त्याने फांदी पकडण्यासाठी उंच उडी घेतली. पण त्याच्या हाताची पकड फांदीला बसली नाही. तेव्हा त्याला जमिनीवरही तोल सावरता आला नाही. झोक्‍याबरोबर फांदी उंच गेली आणि तो जवळपास सहा फूट उंचीवरून छातीवर पालथा आपटला. एखादी जमिनीवर आलेली मुळी तेथे नव्हती म्हणून बरे. माझे चुलते जवळच वासराला पाणी देत होते. धपकन झालेल्या आवाजाच्या दिशेने पाहून ते धावले. त्यांनी त्याला उचलले तर तो निपचीत झाला होता. चुलते मोठ्याने ओरडले. सारे धावले. बऱ्याच वेळाने तो सावध झाला. पण चार दिवस मलूलच होता. तो बरा झाला, ही पिंपरणीची छत्रछायाच म्हणायची. तिने सर्वांना लळाजिव्हाळाच लावला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muktapeeth article written by sushila sankpal